प्रशांत भदाणे
जळगाव : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानं राज्याचं राजकीय वातावरण अस्थिर झालंय. ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर आता राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येतंय. ठाकरे सरकारचे अस्तित्व दोलायमान झाल्यानं दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जळगावात दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे गुरुवारी सकाळी तातडीने मुंबईला रवाना झाले. खडसेंनी आपल्या स्वागताचे सर्व कार्यक्रमही रद्द केले.
विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर एकनाथ खडसे हे मंगळवारी रात्री मुंबईहून मुक्ताईनगरला आले होते. बुधवारी दिवसभर निवासस्थानी थांबल्यानंतर आज ते सकाळीच तातडीने मुंबईला रवाना झाले. खडसे जळगावात येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जंगी सत्काराचे नियोजन केलं होतं. पण राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व आमदारांची तातडीने मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी खडसे तातडीनं रवाना झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाकडे खडसेंची पाठदरम्यान, मुंबईत आयोजित बैठकीला जाण्यासाठी खडसे गुरुवारी सकाळीच त्यांच्या मुक्ताईनगरातील निवास्थानावरून कारने निघाले होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते जळगावात पोहचले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी नियोजन केलं होतं, पण खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर रस्त्यावरच पुष्पगुच्छ स्वीकारला. दोन मिनिटं थांबून ते लगेच मुंबईला निघाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयातही जाणं टाळलं. राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता, खडसेंचे सत्काराचे कार्यक्रम रद्द केले, अशी माहिती नंतर कार्यकर्त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थितीखडसे मुक्ताईनगरहून जळगावमार्गे कारने मुंबईला निघाले होते. त्यांच्या स्वागतासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात फक्त खडसे समर्थक थांबले होते. राष्ट्रवादीतील एकाही प्रमुख पदाधिकाऱ्याने खडसेंच्या स्वागतासाठी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजीही चव्हाट्यावर आलीये.