जळगाव - एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे राज्यात जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील बैठकांचा सपाटा सुरू आहे. मुंबईत बैठका आटोपून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे जळगावमध्ये दाखल झाले आहेत. मात्र खडसेंनी राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात बोलण्यास नकार दिला. ठाकरे सरकार पडेल का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी 'जय श्रीराम' एवढीच प्रतिक्रिया देत काढता पाय घेतला.
सध्या जे राजकारण चालले आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. हे सगळे घडत आहे, त्यासाठी कुणी तरी ताकद दिल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाहीत. कोण त्यांच्या पाठीमागे आहे, हे भविष्यात समोर येईलच, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणमध्ये केलं होतं.
४० वर्षांत असे राजकारण मी अनुभवले नव्हते. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कुणाबरोबर आहे, यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल, अशी स्थिती आहे, याकडे खडसे यांनी लक्ष वेधले होते.
"ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना ..."; एकनाथ खडसेंच्या कन्येचं 'ते' ट्विट जोरदार चर्चेत
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटर हँडलसह फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी "आयुष्यात एकच नियम पाळा ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना हरवण्याची स्वप्ने कधीच पाहू नका..." अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. खडसेंच्या याच ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. रोहिणी खडसे यांनी केलेल्या ट्विटमधून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या संकटाच्या काळात शिवसेनेसोबत असल्याची भूमिका जाहीर केली आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी केलेल्या ट्विटचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.