जळगाव : गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी रात्री तब्बल सव्वा तास मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. निसर्ग राजा यंदा तरी आम्हाला दगा देऊ नकोस, अशी आर्त हाक शेतकरी निसर्गाला देत आहे.
सुरुवातीला रोहिण्या कोरड्या गेल्या. तर मृग नक्षत्रामध्ये पावसाच्या काही सरी बरसल्या. पेरणीसाठी पूरक पाऊस न झाल्यामुळे पेरण्या लांबणीवर पडत असल्याने शेतकरी चिंतेत होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आर्द्रा नक्षत्र सुरू झाले. त्याचे वाहन मोर आहे. या नक्षत्रात तरी पाऊस होणार की नाही अशी शंकाही उपस्थित होत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, प्रचंड उष्णता होती. रविवारी दुपारी कडक ऊन पडल्याने आर्द्राचा दुसरा दिवस कोरडाच जाणार, अशी शक्यता व्यक्त होत होती मात्र रात्री साडेनऊ नंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल एक ते सव्वा तास जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
असा आहे पुढील अंदाज...
१० ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस, १० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पर्जन्यमान मध्यम, यानंतर २० सप्टेंबरपर्यंत पाऊस ओढ धरेल किंवा खंडित वृष्टी होईल. यानंतर पुन्हा पाऊस सक्रिय होऊन दि. २० ऑक्टोबरपर्यंत मध्यम स्वरुपाचा पडेल आणि सरासरी भरून निघेल इतका पाऊस होईल. १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. या दरम्यान भगवान महावीर निर्वाण दिन, दिवाळी, तुळशी विवाह सोहळा आहे. एकंदरीत आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, हस्त, चित्रा नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल, असा अंदाज पंचांगामध्ये वर्तविला आहे.
नक्षत्र, वाहन दर्शवते पर्जन्यमान...
१) पंचांगानुसार दरवर्षी पावसाच्या नक्षत्रानुसार त्याचे वाहन ठरते. त्या नक्षत्राचे त्यावर्षीचे वाहन काय आहे. यावरूनही पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतो.२) नक्षत्राचे वाहन बेडूक, म्हैस किंवा हत्ती असेल तर भरपूर पाऊस, वाहन जर मोर, गाढव, उंदीर असेल तर मध्यम पाऊस आणि वाहन जर कोल्हा किंवा मेंढा असेल तर कमी पाऊस, असे ठोकताळे बांधण्यात येतात.३) वाहन जर घोडा असेल तर केवळ पर्वतीय भागात पाऊस पडण्याचे संकेत समजले जातात. काही नक्षत्रांना तरणा, म्हातारा, सासू, सून अशी नावेही ग्रामीण भागात दिलेली आहेत.
पावसाची नक्षत्रे व वाहनदिनांक - नक्षत्रे - वाहन२१ जून - आर्द्रा - मोर५ जुलै - पुनर्वसू - हत्ती१९ जुलै - पुष्य - बेडूक२ ऑगस्ट - आश्लेषा - गाढव१६ ऑगस्ट - मघा - कोल्हा३० ऑगस्ट - पूर्वा - उंदीर१३ सप्टेंबर - उत्तरा - हत्ती२६ सप्टेंबर - हस्त - मोर१० ऑक्टोबर - चित्रा - म्हैस२३ ऑक्टोबर - स्वाती - कोल्हा