Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, आज प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे, आज सांगता सभा होणार आहेत. यापार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. 'यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल.आपण सर्वांनी रोहिणी खडसेंचा निवडून द्यावे',अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे.
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का?
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहिणी खडसे निवडणूक लढत आहेत. लेकीसाठी एकनाथ खडसे यांनी कंबर कसली असून या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठापणास लागली आहे. दरम्यान, आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी भावनिक साद घातल्याचे दिसत आहे. "मी नाथाभाऊ बोलतोय, येणाऱ्या २० तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत रोहिणीताई खडसे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत आहे. यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे',असंही एकनाथ खडसे म्हणाले.
"माझी तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार, हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी रोहिणी खडसेंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना सहकार्य करावं, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे.