जळगाव : गेल्या वर्षी जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्ष केंद्र सुरू झाल्यानंतर, आता १ मे महाराष्ट्र दिनापासून हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्रही सुरू होत आहे. हरियाणा राज्यातील गुरूग्राम येथील जेट सर्व्ह एव्हिएशन या कंपनीतर्फे हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत असून, संस्थेतर्फे या प्रशिक्षण केंद्रासाठी सध्या दिल्ली येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाद्वारे भारतात आणि इतर देशांमध्ये असलेली वैमानिकांची गरज आणि मागणी लक्षात घेता भारतातील सर्व सुविधा असलेल्या विमानतळांवर `फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी `सुरू करण्यात येत आहे. जळगाव विमानतळार नाईट लॅडिंगसह इतर सर्व सुविधा असल्यामुळे एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजीवकुमार यांनी जळगाव विमानतळावर हेलीकॉप्टर प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे गेल्या वर्षी जाहिर केले होते. तसेच मध्यप्रदेशातील खजुराहो या ठिकाणीदेखील हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याचे जाहिर केले होते.या मध्ये खजुराहो येथील प्रशिक्षण केंद्र गेल्या महिन्यात सुरू झाले असून, जळगावचे प्रशिक्षण केंद्रही आता १ मे पासून सुरू होत आहे.
राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र :
सध्या महाराष्ट्र राज्यात काही खासगी शिक्षण संस्थांचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र, यात हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र कुठेही नाही. त्यामुळे केंद्रिय नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे जळगाव विमानतळावर सुरू करण्यात येणारे हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र हे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे.
उद्घाटनासाठी केंद्रिय उड्डाणमंत्र्यांना निमंत्रण..
जळगाव विमानतळावर सुरू होणारे हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र हे केंद्र शासनाने मंजुरी दिलेले राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र असणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घटनासाठी जेट सर्व्ह एव्हिएशन व स्थानिक विमानतळ प्रशासनातर्फे केंद्रिय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निमंत्रण दिले असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव विमानतळावर हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. डीजीसीएकडे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत परवानगी मागितलीअसून, येत्या दोन ते तीन दिवसात परवानगी मिळणार आहे. त्यानंतर १ मे पासून हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. प्रशिक्षणासाठी हेलिकॉप्टर व विद्यार्थी पुढील आठवड्यात जळगावला येतील.- विवेक यादव, ऑपरेशन व्यवस्थापक, जेट सर्व्ह एव्हिएशन, जळगाव विमानतळ.