लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: मानवी सभ्यतेचे भविष्य म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना प्रभावित करण्याची ताकद होती आणि आजही आहे. चांगल्या नेतृत्वाचा लोक नेहमी सन्मान करतात त्यासाठी आपले नेतृत्व कसे आहे याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी संपूर्ण जगात हिंसा सुरू होती त्यावेळी महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला. हिंसा म्हणजे अंधकाराचा मार्ग असून अहिंसक मार्गाने निर्माण झालेले नेतृत्व हे शाश्वत असते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ४ ऑक्टोबर पर्यंत नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन केले आहे. कॅम्पच्या उद्घानाप्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ. के. बी. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अनुभती निवासी स्कूलच्या संचालिका नीशा अनिल जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अंबिका जैन, रिसर्च डीन प्रो. गीता धरमापाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई उपस्थित होते.
नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये नेपाळसह, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह १६ राज्यातील युवकांनी सहभाग घेतला आहे.कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलाने झाली. यानंतर अनुभूती निवासी स्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘घुम चरखे घुम..’ हे गीत म्हटले. नितीन चोपडा यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश कुळकर्णी यांनी आभार मानले.
विविध विषयांवर होईल मंथन
गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू झालेल्या नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्प युवकांना गांधी विचार समजावे अहिंसा, सत्य या विचारांचे नेतृत्व कौशल्य निर्माण व्हावे, यासाठी मूल्यवर्धित शिक्षण-प्रशिक्षण देत आहे. या कॅम्पमध्ये गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधीजींचे पणतू तुषार गांधी, मध्यप्रदेशच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुराधा शंकर, डॉ. एम. पी. मथाई, कल्याण अक्कीपेडी, विनय चारूल, रमेश पटेल, अमृत देशमुख, अशोक जैन, अनिल जैन, मुंबईचे प्रसिद्ध गजलकार फराजखान अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.