भुसावळ : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत साडेसहा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. यात माजी जिल्हा व्यवस्थापक व लेखापाल यांनी दलालाला हाताशी धरून भुसावळातील बोगस लाभार्थी दाखविले आहेत. जे लाभार्थी अस्तित्वातच नाहीत तर काहींचे काल्पनिक नाव व पत्ते वापरले आहेत. यासंदर्भात जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातून संदीप प्रभाकर साबळे यास अटक केली असून, त्याच्या गणेश नगरातील घराची शुक्रवारी झडती घेतली.
म. फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून अर्थसहाय्य घेताना बोगस लाभार्थी दाखवून महामंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांनी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केला असून, त्यात ७०२ बोगस लाभार्थी दाखविण्यात आले आहेत. यात महामंडळ व बँकांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एजंट आदींचा समावेश आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत हा अपहार झाला आहे. याप्रकरणी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली जाधव यांनी २ ऑगस्ट २०१९ रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. यात बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दलालांना हाताशी धरुन एकाचा फोटो दुसऱ्याच्या आधार कार्डवर, पत्ता तिसऱ्याचाच अशा प्रकारची तब्बल ७०२ बोगस प्रकरणे तयार करून बीज भांडवल योजनेंतर्गत साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केला.
जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी भुसावळ येथून संदीप साबळे यास अटक केली व त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळीराम हिरे, हवालदार चंद्रकांत शिंदे, राजेंद्र पाटील, अधिकार पाटील व भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गणेश नगरातील संदीप साबळे याच्या घराची झडती घेतली; मात्र त्यात काहीही आढळले नाही, असे हिरे म्हणाले.