चाळीसगाव : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची टीका
चाळीसगाव : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व घटक भरडले जात आहेत. शेतकऱ्यांना तर आघाडीने वाऱ्यावर सोडले आहे. तर राज्य सरकार मात्र वसुली करण्यातच गुंग असल्याची टीका माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी केली.
चाळीसगाव येथे शेतकरी मेळाव्यासाठी ते आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते.
ते म्हणाले की, राज्यभरातील बळीराजा अनंत अडचणीत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असतांना बँका पीक कर्ज देण्यास नकार देत आहे. मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना देखील भरपाई मिळालेली नाही. बहुतांशी ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा आहे.
महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयातही टिकले. तथापि, महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडले असल्याचे ते म्हणाले.