जळगाव : सर्वोच्च न्यायालयात निकाल लागून सागर पार्कची जागा महापालिकेच्या मालकीची झाली असली तरी या जागेच्या मुळ मालकाला वाढीव मोबदला मिळावा, यासाठी महाविकास आघाडीने १०० कोटी रुपयांची सुपारी घेतली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यासाठी थेट मंत्रायलयातून मनपा आयुक्तांवर दबाव येत असून महिला वकील येऊन आयुक्तांना या विषयी वारंवार विचारणी करीत असल्याचाही आरोप आमदार भोळे यांनी केला.
भाजपच्यावतीने रविवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या सफाईच्या मक्त्यासाठी नगरसेवकांना ‘पाकीट’ दिले जात असल्याचे विरोधक आरोप करीत असल्याच्या मुद्द्यावर आमदार सुरेश भोळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील आरोप केला.
सरकारी वकीलही मॅनेज
या वेळी सुरेश भोळे म्हणाले की, महापालिकेवर आरोप केले जातात. मात्र महापालिका जे काम करते, त्याविषयी दबाब आणला जातो. अशाच प्रकारे आता सागर पार्कच्या जागेसाठी मनपा आयुक्तांवर थेट मंत्रालयातून दबाव येत असल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला. यामध्ये मनपाने सागर पार्कच्या जागेचा मोबदला मूळ मालकाला दिला आहे. तरीदेखील वाढीव मोबदला मागितला जात असून यासाठी महाविकास आघाडीने १०० कोटींची सुपारी घेतली आहे. इतकेच नव्हे असे अनेक प्रकार या पूर्वीदेखील घडले असल्याचे सांगत यासाठी सरकारी वकीलही मॅनेज केले जातात, असाही आरोप या वेळी आमदार भोळे यांनी केला.
मलिदा खाणाऱ्यांची नार्को टेस्ट करा
शिवाजीनगर भागात कोल्हे यांच्या जागेविषयीदेखील असाच प्रकार घडल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला. ही जागा तत्कालीन नगरपालिकेने संपादीत केली होती. त्या वेळी मूळ मालकाना १२ लाखाचा मोबदलाही देण्यात आला. खरेदी झाली मात्र ही जागा केवळ मनपाच्या जागेवर झाली नव्हती. नंतर ही जागा शोधून काढण्यात आली व त्यासाठी वाढीव मोबदला मागण्यात आला व त्यासाठी सध्याच्या बाजारभावाप्रमाणे १२ कोटी रुपयांचा मोबदला द्यावा लागला होता. या जागेविषयी आमदार भोळे म्हणाले की, मूळ मालकाने मोबदला मागितला तरी या जागेवर घरकूल आहे. ती जागा परत मागितली जात होती. तेथे २५० घर उद्धस्त झाली असती. अखेर मालकाला वाढीव मोबदला द्यावा लागला. यात ॲड. नारायण लाठी यांनीदेखील मलिदा खाल्ला असा आरोप करीत आमदार भोळे यांनी केला. अशा मलिदा खाणाऱ्या वकिलांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी आमदार भोळे यांनी या वेळी केली.