लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : ६६ ग्रामपंचायातींच्या निकालात सोमवारी गावगाड्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल झुकल्याचे चित्र स्पष्ट झाले असून मोठ्या ग्रामपंचायतींवरही महाविकास आघाडीचे निशाण फडकले आहे.
भाजपाची काहीअंशी पिछेहाट झाली असली तरी, सर्वच लढती चुरसपूर्ण झाल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. या निकालांमुळे गावकीच्या मातीतील राजकारणाचे रंगही स्पष्ट होत असून वर्षभरानंतर होणा-या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आगामी काळात होणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीची ही रंगीत तालिम मानली जात आहे. वाघळीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष व जि. प. सदस्य पोपट भोळे यांना धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे.
निकालाची मतमोजणी आज सकाळी १० वाजता येथील य. ना. चव्हाण महाविद्यालयात सुरु झाली. पहिल्या १५ मिनिटातच पहिल्या फेरीचे निकाल घोषित झाले. यातील काही गावांमध्ये भाजपाला टक्कर देत महाविकास आघाडीने विजयाचा गजर केला. गेल्या अनेक वर्षापासून भाजपाचा गड असलेल्या पिलखोड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावून भाजपाप्रणित पॕनलला व्हाईटवाॕश दिला आहे. सायगावचे मैदान पुन्हा राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य भूषण पाटील यांनी राखले आहे. यावेळी त्यांनी बहुमताने सत्ता खेचून आणली. बहाळ ग्रामपंचायतीवरुन भाजपाने राष्ट्रवादीचे निशाण उतरविले असून भाजपाला नऊ तर राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या आहेत.
जामदा ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादी प्रणित पॅनलने विजयी गजर केला आहे. येथे पालिकेतील भाजपा गटनेते संजय रतनसिंग पाटील आणि बाजार समितीचे माजी सभापती सरदारसिंग पाटील यांच्या पॕनलला अवघी एक जागा मिळाली आहे. राष्ट्रवादीने नऊपैकी आठ जागा राखल्या आहेत. भोरस ग्रामपंचायतीवर पं. स.चे उपसभापती सुनील पाटील यांनी वर्चस्व राखले आहे. अगोदरच त्यांच्या सहा जागा बिनविरोध झाल्या असून आजच्या निकालात त्यांना पुन्हा दोन जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी आपल्या बोरखेडे ग्रामपंचायतीचे मैदान राखले आहे. त्यांच्या पॕनलला नऊपैकी सहा जागा मिळाल्या. लोंढेत सर्वपक्षीय पॕनलने पूर्ण ११ जागांवर विजयी गुलाल उधळून भाजपाचे पं.स.सदस्य कैलास पाटील यांच्या पॕनलचा सफाया केला आहे. न. पा.चे माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम यांनी धामणगाव ग्रामपंचायतीवर विजयाचे तोरण बांधले आहे.
विजयी उमेदवारांनी आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयात जाऊन भेटी घेतल्या. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी विजयाचा जाल्लोष केला.