सर्व जागा लढविण्यावर भर : बैठकीत झाली चर्चा ;
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - ग.स.सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एप्रिल ते जून दरम्यान जाहीर होण्याची शक्यता असून, यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. ग.स.च्या निवडणुकीत आता महविकास गट देखील रिंगणात उतरणार असून, आगामी निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी महाविकास गटाच्या पदाधिकाऱ्यांची पद्मालय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत निवडणुकीच्या विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती महाविकास गटाच्या कोअर कमिटीचे प्रमुख नाना पाटील यांनी दिली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. नाना पाटील, टिकाराम पाटील, ईश्वर सपकाळे, नरेंद्र सपकाळे, अनिल चौधरी, राजेश जाधव, शांताराम माळी, संदीप पाटील, कोमलसिंग राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी नाना पाटील यांनी सांगितले की, सत्ताधारी गटाने सभासद हितापेक्षा स्वहितासाठीच काम केले. निवडणूक आल्यावर या गटातून त्या गटात जाणे आणि सभासद हिताच्या गप्पा मारणे याशिवाय दुसरे काहीही झाले नाही. संस्थेत बदल घडविण्यासाठी महाविकास गट आगामी निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे नाना पाटील यांनी सांगितले.
सर्व जागा लढण्यावर भर, सोबत आल्यास स्वागत करू
महाविकास गटाची बैठक रविवारी दुपारी पद्मालय विश्रामगृह येथे झाली. महाविकास गटाचा निर्णय कोणतीही एक व्यक्ती निर्णय घेणार नसून त्यासाठी पाच जणांची कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. त्यात नाना पाटील, ईश्वर सपकाळे, नरेंद्र सपकाळे, कोमलसिंग राऊळ, राधेश्याम पाटील यांचा समावेश आहे. आगामी निवडणूक स्वबळावर आणि सर्व जागांवर लढण्याची तयारी महाविकास गटाची असून, जर इतर गट सोबत आले तर त्यांनाही सोबत घेऊ, असेही नाना पाटील यांनी सांगितले. पॅनलमध्ये उमेदवारांची निवडीचा अधिकार कोअर कमिटीला देण्यात आला आहे. सभासदांच्या मागणीतून गट तयार केल्याने पॅनलमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.