लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वत्र चुरसपूर्ण वातावरणात मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय प्राबल्य नसले तरी महाविकास आघाडी व भाजपने निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा दावा केला आहे.
जळगाव तालुक्यातील मोठे गाव असलेल्या नशिराबाद ग्रा.पं.साठी एक उमेदवार वगळता सर्वांनी माघार घेतल्यामुळे नशिराबादमध्ये यावेळी सामसूम होती. तालुक्यातील शिरसोली येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा दोन्ही पॅनलचा सामना रंगला. शिरसोली प्र.न.मध्ये माजी उपसरपंच शेनफडू पाटील व माजी सरपंच अनिल पाटील यांचे पॅनल समोरासमोर होते. दोघे पॅनलप्रमुख हे शिवसेनेचे खंदे समर्थक आहेत. शिरसोली प्र.बो.मध्येदेखील तीच परिस्थिती होती. या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील यांचे वर्चस्व पणाला लागले आहे.
दापोरा येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नरेंद्र सोनवणे यांच्या पॅनल विरुद्ध प्रकाश काळे यांचे पॅनल होते. वावडदा येथे शिवसेनेचे कार्यकर्ते रवी कापडणे यांच्याविरुद्ध राजेंद्र नारायण वाढेकर यांचे पॅनल होते. आव्हाणे येथे आव्हाणे विकास व ग्रामविकास पॅनलमध्ये चुरस होती. पंचायत समितीचे सदस्य हर्षल पाटील यांनी या ठिकाणी नेतृत्व केले. फुपनगरीत जितेंद्र अत्रे यांच्या युवा शक्ती ग्रामविकास व राहुल जाधव, गणेश जाधव यांच्या परिवर्तन विकास पॅनलमध्ये तगडी टक्कर आहे. गाढोद्यात रामचंद्र सीताराम पाटील व गोपाळ फकीरचंद पाटील यांच्या पॅनलमध्येच पारंपरिक लढत आहे. दोन्हीही नेते शिवसेनेचे असल्याने ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच आहे.
म्हसावद ग्राम पंचायतीमध्ये प्रगती पॅनल विरुद्ध नम्रता पॅनल अशी लढत राहिली. १७ जागांसाठी लढत झाली. सर्व जागांवर मात्र दोन्ही पॅनलला निवडणुक लढविता आल्या नाही. कानळदा येथे पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण व भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांचे वर्चस्व पणाला आहे. याठिकाणी राजेंद्र चव्हाण यांच्या विरूद्ध सेवानिवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे रिंगणात होते. चव्हाण यांच्या पत्नी व जि.प.च्या माजी महिला व बालकल्याण सभापती निता चव्हाण, मुलगा ऋषिकेश हेदेखील निवडणुक रिंगणात आहेत.
कोट
१५ ते १६ जागांवर भाजपचे वर्चस्व
भाजपला तालुक्यातील १५ ते १६ जागांवर बहुमत मिळेल असा विश्वास आहे. उर्वरित जागांवर संमिश्र प्रतिसाद असणार आहे.
गोपाळ भंगाळे, भाजप तालुकाध्यक्ष, जळगाव
७० टक्के ग्रा.पं.वर यश
जळगाव तालुक्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती. त्यामुळे शिवसेनेला ७० टक्के ग्रा.पं. निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास आहे. शिरसोली, म्हसावद, भोकर, नांद्रा खुर्द, बुद्रुक, गाढोदा, कठोरा या ठिकाणी निश्चित यश मिळणार आहे.
राजेंद्र चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख, जळगाव
२५ ग्रा.पं.वर मिळणार यश
राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या डिकसाई ग्रा.पं. बिनविरोध झाली आहे. यासोबतच २५ ते २६ ग्रा.पं. मध्ये राष्ट्रवादीला यश मिळेल, असा विश्वास आहे.
बापू परदेशी, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, जळगाव