भूषण श्रीखंडे
जळगाव : जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगाव परिमंडळातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या सोयीसाठी महावितरणतर्फे ‘ एक खिडकी ’ उपक्रम सुरु केला आहे. उपविभागीय कार्यालयात ‘ एक खिडकी ’ ची सुविधा उपलब्ध असणार असून, याचा गणेश मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.
महावितरणने गणेश मंडळांना तात्पुरत्या जोडणीपासून विजेसंबंधीच्या सर्व सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी ‘ एक खिडकी ’ उपक्रम हाती घेतला आहे. उपक्रमात प्रत्येक उपविभागीय स्तरावरील कार्यालयात ‘ एक खिडकी ’ सोमवारपासून सुविधा केली आहे. यात सर्व गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात वीजजोडणी करून देण्याच्या सूचना मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी महावितरण विभागाच्या यंत्रणेस दिल्या आहेत.
घरगुती दरात वीज मिळणार
गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या जोडण्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असणार आहेत. त्यासाठी घरगुती वर्गानुसार वीज दरानुसार जोडणी व बिल आकारले जाणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना याचा फायदा होणार आहे.