लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एमआयडीसीतील व्ही-५८ सेक्टरमधील महेश प्लास्टिक कंपनीच्या कार्यालयात व गोडावूनमध्ये डल्ला मारीत तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणातील दुसऱ्या संशयित चोरट्यास पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आहे. भंगार विक्रेता सय्यद मुश्ताक सय्यद हसन (३७,रा. अक्सानगर, मेहरून) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी १९ मे रोजी अरविंद अरुण वाघोदे (२४, रा.हरिविठ्ठलनगर) याला अटक केली होती. त्यास २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपली असता त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
अरविंद याच्यासोबत सय्यद मुश्ताक याचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली. मुश्ताक हा अजिंठा चौफुलीजवळ असल्याची माहिती मिळताच, रात्री पोलिसांनी त्याला अटक केली. शनिवारी त्यास न्यायालयात हजर केले असता, २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुश्ताक हा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.