मोलमजुरी करणाऱ्या महिला आर्थिक विवंचनेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा परिणाम तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येकावर झाला आहे. घराघरांमध्ये मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या मोलकरणींनाही आता आर्थिक चिंतेने घेरले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढल्यामुळे पन्नास ते साठ टक्के घरांमध्ये मोलकरणींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले होते. तेव्हापासून बहुतांश घराचे दरवाजे मोलकरणींसाठी बंद झाले होते. घरकाम करणारी महिला ही आणखी तीन ते चार घरांचे काम करून येते. त्यामुळे या महिलांपासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच धास्तीने अनेक घरांमध्ये महिलांनी कामाला येणाऱ्या महिलांना सुटी देऊन घरातील सगळी कामे स्वत: करायला सुरूवात केली आहे.
घरखर्च भागवणे कठीण....
घरात चार ते पाच लोक आहेत. प्रत्येकाच्या कामावर कोरोनामुळे परिणाम झाला आहे. त्यामुळे घरखर्च भागविणे कठीण होत आहे. काही घरांमध्ये आमचा पगार कापणार नाही, असे सांगितले आहे. परंतु, संसर्ग काही महिने आणखी राहिला तर आम्हाला तरी बिना कामाचा पगार लोक किती महिने देतील. त्यामुळे आम्हालाही चिंता पडली आहे, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगितले.
एका घरातून मिळतात ५०० रुपये
साधारणपणे मोलकरणींना ५०० रुपये महिना पगार मिळतो. काही ठिकाणी ४०० तर काही ठिकाणी १ हजार रुपयेसुध्दा पगार मिळतो. अशी दहा-बारा घरे मिळून पाच ते सहा हजार रुपये महिन्याला पगार मिळविणाऱ्या मोलकरणींच्या हाती आता फक्त दोन ते अडीच हजार रुपये पगार मिळत आहे. यातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे.
कुटुंबासमोर अडचणी
मार्केटसुध्दा सुरू-बंद होत असल्यामुळे पतीच्या हाताला सुध्दा काम नाही. त्यामुळे कुटुंबासमोर आर्थिंक अडचण उभी राहिली आहे, असेही काही मोलकरणींनी सांगितले.
शहरातील मोलकरणींची साधारण संख्या
- १०००
शहरातील मोलकरणींच्या हाताला काम मिळेना
- ४५० (सुमारे)
पाच जणांचे पोट कसे भरणार?
दहा दिवसांआधी १२ घरांची कामे सुरू होती. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे इतरांनी सुटी दिली आहे. त्यामुळे आता फक्त चार घरांची काम सुरू आहेत. घरात पाच ते सहा लोक आहेत. कसातरी उदरनिर्वाह करीत आहे.
- साजेदा बी
लॉकडानच्यावेळी बहुतांश घरांमधील काम बंद झाली. जेमतेम आता काही घरांमध्ये काम मिळाले. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. परिणामी, ज्या घरांमध्ये काम मिळाले तेसुध्दा आता बंद झाले आहे. बोटावर मोजण्या इतक्याच घरांमध्य़े सध्या काम सुरू आहे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.
- लता कोळी
सध्या कमी घरांमध्ये धुणे, भांडे व झाडूपोछाची कामे सुरू आहेत. बोटावर मोजण्या इतकीच घरे असल्यामुळे शेती कामे करून कुटुंबाचा गाडा हाकत आहे. पतीसुध्दा घरीच असल्यामुळे आर्थिक अडचण भासत आहे.
- संगीता तायडे