ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 1 - राष्ट्रीय मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत नियमांचा भंग करुन सामने झाले. स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यातील 23 स्पर्धक सहभागी झाले होते. सामने होऊनदेखील त्यांना प्रमाणपत्रे व पदके दिले नाहीत. प्रत्येक स्पर्धकाने सहभागी होण्याचे दोन हजार शुल्क दिले असून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी शिमला येथील मुख्य आयोजक मास्टर भूपेंद्रसिंग आणि प्रिया रांटा यांच्या विरोधात चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविणार असल्याची माहिती स्थानिक आयोजक मास्टर फिरोज खान यांनी बुधवारी दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.27 व 28 रोजी आर. के. लान्स येथे राष्ट्रीय स्तरावरील मिक्स मार्शल स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. स्पर्धेत पहिल्या दिवसापासून वयोगटाबाबत नियम भंग केले गेले. रोहित नीलेश राणा आणि यश विजय गायकवाड या 14 वर्षाखालील स्पर्धकांना 19 वर्ष वयोगटातील स्पर्धकांसोबत खेळविण्यात आले. या स्पर्धकांनी स्वत: पत्रपरिषदेत प्रकार कथन केला. अल्फिया शेखचा सामना शिमला येथील मुलाबरोबर लावण्यात आला. यावर आक्षेप घेतल्यानेच मास्टर भूपेंद्रसिंग आणि प्रिया रांटा यांना राग आला. स्पर्धा होऊनही रद्द करण्याचा अन्यायकारक निर्णय त्यांनी जाहीर केला. स्पर्धा भरविण्याची संपूर्ण जबाबदारी मास्टर भूपेंद्रसिंग व प्रिया रांटा यांचीच होती. त्यांनी आयोजनासाठी छदामही दिला नाही. असेही खान यांनी सांगितले. मास्टर भूपेंद्रसिंग याने पोलिस स्थानकात जीवे मारण्याची धमकी दिली. पंचांनी चुकीचे निर्णय दिले. स्पर्धेच्या ठिकाणी पालकही उपस्थित होते. चुकीचे निर्णय दिल्यामुळे पालकांचादेखील संताप झाला. पत्रपरिषदेच्यावेळी काही पालकांनीही आँखो देखी सांगितली. 23 स्पर्धकांचे प्रत्येकी दोन हजार असे 46 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविणार असल्याचे फिरोज खान यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धकही
शिवनाथ सजेर्राव राठोड या 23 वर्षीय स्पर्धकाला अफगाणिस्तानच्या हारुन स्पर्धकांसोबत खेळविले गेले. हा सामाना राठोड याने जिंकला. मात्र त्याला पराजित म्हणून घोषित केले. पत्रपरिषदेत शिवनाथने आपल्यावरील अन्याय कथन केला. यावेळी त्याच्या सामन्याची व्हीडीओ क्लिपही दाखवण्यात आली.