एलसीबीची कारवाई : आणखी दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : व्हॉट्सॲपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून चौघुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबार झाल्याची घटना रविवारी घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विजय जयवंत शिंदे (२३,रा.चौघुले प्लॉट) याला पकडण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले असून त्यास बुधवारी पाळधीतून अटक करण्यात आली आहे.
विजय शिंदे याने व्हॉट्सॲपवर चिथावणे देणारे स्टेट्स ठेवले होते. याचा जाब विचारण्यासाठी विक्रम सारवान व त्याच्यासह काही जण रविवारी सायंकाळी चौघुले प्लॉट भागात आले होते. त्यावेळी सारवान व शिंदे गटात उफाळून गोळीबार झाला. तसेच दगडफेक सुध्दा झाली होती. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. गोळीबारात विक्रम सारवान याच्या कानाला गोळी चाटून निघून गेली होती. त्यामुळे तो जखमी झाला होता. त्यानंतर याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात विजय शिंदे, राहुल शिंदे, किशोर शिंदे, राकेश साळुंखे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव तालुक्यात घेतला शोध
गोळीबारानंतर शिंदे गटातील सर्व फरार झाले होते. त्यांचा एलसीबीसह शनिपेठ पोलीस शोध घेत होते. गोळीबारातील मुख्य संशयिताचा एलसीबी पोलिसांनी जळगाव तालुक्यातील अमोदा, धार्डी, मितावली, भोकर, पाळधी आदी ठिकाणी शोध सुरू केला होता. मात्र, तो मिळून येत नव्हता.
अखेर साईबाबा मंदिर परिसरातून अटक
मुख्य संशयित आरोपी विजय शिंदे हा पाळधीतील साईबाबा मंदिर परिसरात असल्याची माहिती बुधवारी एलसीबी पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी साईबाबा मंदिर गाठले. मंदिराच्या संरक्षक भिंतीजवळ तो उभा असल्याचे पोलिसांना दिसून आले. दरम्यान, पोलीस आल्याचे पाहताच, पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच पोलिसांनी त्यास अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रितम पाटील आदींनी केली आहे.
अन्य दोघांनाही अटक
गोळीबार प्रकरणातील संशयित किशोर शिंदे व राहुल शिंदे या दोघांना सुध्दा शनिपेठ पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.