लोकमत न्युज नेटवर्क
जळगाव : स्थूलता हे अनेक विकारांचे कारण असू शकते. त्यामुळे योग – निसर्गोपचाराच्या माध्यमातून शारिरीक फिटनेस प्राप्त करणे आणि टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. गीतांजली भंगाळे यांनी केले.
महिलांमध्ये याविषयीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातर्फे ‘ फॅट टू फिट ” या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. १० ते १४ मार्च या कालावधीत ही कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेत सहभागी महिलांना शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास प्रात्यक्षिक शिकविण्यात आले. तसेच रोज ४ ते ५ या वेळात एक तास योगाभ्यासाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रशुद्ध पध्दतीने मार्गदर्शन करण्यात आले. महिलांकडून योगाभ्यासाचा सराव करून घेण्यात आला. महिलांमधील वाढता स्थूलपणा व त्यावर उपयुक्त अशा जलद हालचाली,आसने आणि प्राणायाम ,शुद्धिक्रिया यांच्या साह्याने स्थूलपणा कमी करता येतो. त्याच बरोबर योग्य आहाराने सुद्धा वाढलेले वजन नियंत्रण कसे करावे यावर मार्गदर्शन करण्यात आले.