डॉ.हेमांगी पूर्णपात्रे यांनी दिलेल्या 34 पुस्तकांमध्ये 28 पुस्तके इंग्रजी भाषेत आहेत. द स्पोटेड स्पिनिक्स (जाय अॅॅडमसन), इकॉनॉमिक्स विथ अॅनिमल्स (गोल्ड डय़ूरेल), द टायगर ऑफ राजस्थान (कर्नल सिंग), थँक्यू आय प्रिपेअर लॉयन्स (पटरिया बोन्स), अ बायोग्राफी ऑफ सॅन्ट कॉनवर्न, फ्रंट ऑफ वाईल्ड (ग्रॅक डेन्लन स्कॉट) अशा एकाहून एक दर्जदार पुस्तकांचा यात समावेश आहे. वन्यजीवांविषयी पुस्तकांमध्ये दुर्मीळ माहिती आहे. ही सर्व पुस्तके 1960 आणि 1970 मध्ये प्रकाशित झाली आहेत. पुस्तकातील विशेषत: हिस्त्र श्वापदांची स्वभाव शब्द रेखाटने मूळातच वाचनीय आहेत. जंगली प्राण्यांना माणसाळणे याविषयीचे प्रयोग थक्क करणारे आहेत. स्वत: डॉक्टरांनी श्वापदांना माणसाळण्याचे प्रयोग तडीस नेले आहेत. त्यांच्या घरात सिंह, वाघ, बिबटे, माकड, मोर, ससे, हरिण, कुत्री सुखनैव नांदत असतं. त्यांच्या ‘सोनाली’ पुस्तकात याचं मजेशीर आणि चत्मकृतींपर दर्शन होतं. मराठी ल्ेखकांची पुस्तके : वाघ-सिंह माङो सखे- सोबती (दामू धोत्रे), जंगलातील दिवस (व्यंकटेश माडगूळकर), सॅव्होचे नरभक्षक सिंह (मनोहर दातार), सिंहांच्या देशात (व्यंकटेश माडगूळकर), वाघ आणि माणूस (रमेश देसाई) ही एरवी दृष्टीआड असणारी जंगली प्राण्यांविषयी मराठी लेखकांनी लिहिलेली पुस्तकेही डॉक्टरांनी जतन केली होती. गीतेतील मुख्य विचार (डॉ.गजानन खैरे) अशी वेगळ्या विषयावरील काही पुस्तकेही यात आहे. नथुराम गोडसे लिखित ‘प्लिज युअर ऑनर’ या पुस्तकाची मूळ प्रतही या ग्रंथ खजिन्यात आहे. यामुळे माझा वन्यजीवांचा अभ्यास नक्कीच विशेष श्रेणीतला होणार आहे. हे संचित गाठीशी बांधण्याचा आनंदही आहेच. जंगलमौज, वन्यप्राण्यांविषयी जिव्हाळा, पर्यावरणाची पाझरओलं हे डॉ. वा.ग. पूर्णपात्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैविध्यपूर्ण पैलू असले तरी, पुस्तकप्रेमी म्हणूनही त्यांचं स्थान नोंद घेण्यासारखं आहे. त्यांनी स्वत:च्या घरात पुस्तकांनाही एक हक्काचा कोपरा दिलाय. पुस्तकांशी गट्टी जमल्यानेच चाळीसगावच्या शतकोत्तर शेठ ना.बं. वाचनालयाचे सांस्कृतिक भरणपोषणही त्यांनी केलं. पुण्यातील सुहृदयी मित्रांना भेटल्यानंतर डॉक्टरांची फेरी अप्पा बळवंत चौकात हमखास व्हायची. परतताना त्यांची बॅग पुस्तकांनीदेखील भरलेली असायची. यात अर्थातच वन्यजीवांविषयी असणा:या पुस्तकांची संख्या सर्वाधिक असे. त्यांच्या ग्रंथ संग्रहालयात फेरफटका मारला की, नकळत जंगलसफरीसह हिस्रश्वापदांचं मनोज्ञ दर्शन होतं. ‘ग्रंथसखा’ म्हणूनही डॉक्टर आवजरून लक्षात राहतात. घोडय़ावरून रपेट मारणारे डॉ.पूर्णपात्रे बॉलिवूडच्या चित्रपटातील राजबिंडय़ा हिरोसारखेच वाटायचे मला. मी ठरवूनच त्यांच्याशी मैत्रीचे सुत जुळविले. ही मैत्री नातू-आजोबा अशी होती. 1972 मध्ये आमच्या मैत्रीचा सुरू झालेला सिलसिला डॉक्टरांच्या मृत्यूपयर्र्त कायम होता. ‘मला साप पकडायला आवडतं’, असं जेव्हा मी डॉक्टरांना सांगितलं; तेव्हा ते बुचकळ्यात पडले नाहीत. आपल्याला हवा तसा मित्र गवसला. या आनंदाने त्यांचे डोळे लखलखून गेले. वन्यजीवांबाबत आकर्षण असो की पर्यावरण, पुस्तकमैत्री, ‘किती घेशी दो करांनी’, असं डॉक्टरांनी मला भरभरून दिलं. जंगली प्राण्यांबद्दल मला लागलेला लळा ही त्यांचीच देण आहे. डॉक्टरांसोबत वन्य प्राण्यांचे केलेले निरीक्षण, गौताळा अभयारण्यासह सातमाळा डोंगररांगांमध्ये केलेली भ्रमंती, त्यांच्या भडगाव रोडस्थित मळ्यात त्यांनी माणसाळलेल्या प्राण्यांसमवेत जमवलेल्या यादगार मैफिली..हा आठवणींचा कोलाज मर्मबंधनात जपून ठेवावा असाच आहे. (शब्दांकन : जिजाबराव वाघ)
मैत्र वन्यजीवांशी अन् अशीही गट्टी पुस्तकांशी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:12 PM