जामनेर : तालुक्यातील सुमारे ४ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रातील मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. हातात आलेले मक्याचे पीक वाया जाऊ नये यासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहे, मात्र पिकाची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी फवारणी न करता कामगंध सापळे वापरावे असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.यंदा हंगाम चांगला असला तरी मक्यावर पडलेल्या लष्करी अळीने उत्पादनात घाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यात १४ हजार २५० हेक्टर क्षेत्रात मका लागवर झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मक्याचा पेरा कमी आहे. मक्यावर पडलेली लष्करी अळी ही पानाचे आत असल्याने दिसून येत नाही, मात्र ती आतून फळ नष्ट करते. एकूण लागवड क्षेत्रापैकी ३० ते ३५ टक्के भागातील मका बाधित झाला आहे.दरम्यान कृषी सहाय्यकांकडून पाहणी केली जात आहे, अशी माहिती कृषी अधिकारी ए. ए. चोपडे यांनी दिली.नुकसान भरपाईची मागणीमक्यावरील लष्करी अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन मंगळवारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार नामदेव टिळेकर यांना दिले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, संजय गरुड, भगवान पाटील, जावेद मुल्लाजी, अभिषेक पाटील, शैलेश पाटील, प्रल्हाद बोरसे, किशोर पाटील, वसीम शेख नजीम आदी उपस्थीत होते.
लष्करी अळ्यांकडून मका फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 9:41 PM