जळगाव : माझी माती, माझा देश उपक्रमांतर्गत शहरात काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेत संकलित केलेल्या मातीचा कलश घेऊन महानगरपालिकेचे स्वयंसेवक आनंद चांदेकर बुधवारी मुंबई व दिल्लीसाठी रवाना झाले. महापालिकेच्यावतीने शहरात चारही प्रभाग समितीमध्ये अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती. या दरम्यान शहरातील विविध भागातून मातीचे संकलन करण्यात आले. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी शहरात मोठी अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती. शहराचे व जिल्ह्यातील अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित करण्यात आले.
शहराची माती असलेला अमृत कलश बुधवारी मुंबई व दिल्लीसाठी रवाना झाला. २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्तथितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच मुंबईहून विशेष रेल्वेने महाराष्ट्रातील सर्व कलश दिल्ली येथे नेण्यात येणार आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमृत कलश पूजन कार्यक्रम होणार आहे. देभरातून आलेल्या अमृत कलशातील मातीतून आणि रोपांपासून अमृत वाटिका तयार केली जाणार आहे. यासाठी जिल्हा व शासन स्तरावरील समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफीसर म्हणून महापालिकेच्या सहायक आयुक्त अश्विनी भोसले यांची नियुक्ती झाली आहे.