जळगाव : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे अधिकार वापरुन स्वत: च त्यांच्या नावाने स्वाक्षरी व ई-चलन प्रणालीमध्ये परस्पर वाहन मुक्त करण्याचे आदेश तयार करुन कनिष्ठ लिपीक तथा रोखपाल नागेश गंगाधर पाटील यांनी २ लाख २९ हजार ६०० रुपयांच्या महसुलाला चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी पुराव्यानिशी परिवहन आयुक्तांकडे गोपनीय अहवाल पाठवून पाटील यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे.आॅनलाईन एन्ट्री, मात्र रक्कम जमा नाहीएम.एच.१९ बी.एम.५९९५ हे वाहन १९ सप्टेंबर २०१९ रोजी एस.टी. वर्कशॉपमध्ये अटकावून ठेवले होते, नागेश पाटील यांनी ई-चलन प्रणालीवर ३१०० रुपये कॅश आॅन रोड या पेमेंट साईटचा वापर करुन शासनाचा महसूल जमा झाल्याचे भासविले, प्रत्यक्षात २० सप्टेंबर २०१९ रोजी कोणतेही अधिकार नसताना वाहन मुक्त केले व ही रक्कम सरकारी तिजोरीत भरली नाही.काय आहे ई-चलन प्रणालीफेबु्रवारी २०१९ पासून आरटीओ कार्यालयात ई-चलन प्रणाली लागू झाली आहे. वायुवेग पथकाद्वारे कारवाई करुन अटकावून ठेवलेली तसेच तपासणी प्रतिवेदन देण्यात आलेली वाहने ई-चलन प्रणालीवर बॅकलॉग हा कनिष्ठ लिपीक दर्जाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येतो. मोटार वाहन निरीक्षकांनी दिलेल्या तपासणी प्रतिवेदनाच्या अनुषंगाने मोटार वाहनांचे गुन्हे नोंद करुन आॅनलाईन पध्दतीने ई-चलन प्रणालीवर कार्यालयात भरणा करण्यात येतो व दंडाची रक्कम, तडजोड शुल्क, विभागीय कार्यवाही केल्यानंतर वाहन मुक्त केल्याबाबतचे आदेश हे ई-चलन प्रणालीवर जारी करण्यात येतात व त्याची रिलीज आॅर्डर वाहन मालकाला देण्यात येते.वरिष्ठ अधिकारी व पोलिसांकडून अभय?नागेश पाटील यांनी खोट्या सह्या करुन शासनाच्या महसुलाला चुना लावलेला आहे.काशिनाथ पावरा यांनीही आपली फसवणूक केल्याची लेखी तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही व रामानंद नगर पोलिसांकडे केली.लोही यांनी केलेल्या चौकशीत तथ्यही आढळून आले, मात्र तरीही त्यांनी सरकारकडून फिर्याद देणे टाळले. ज्यांनी फिर्याद दिली, त्यांचाही गुन्हा रामानंद नगर पोलिसांनी दाखल केला नाही.केवळ तक्रार अर्ज घेऊन बोळवण केली. त्यामुळे पावरा यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची भेट घेऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.काय ठेवला आहे ठपकापरिवहन आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनुसार, नागेश पाटील यांनी एकूण ४१ वाहनांचे त्यांच्या ई-चलन लॉगीनमध्ये डाटा एन्ट्री करुन या वाहनांना विमा, योग्यता प्रमाणपत्र, परवाना नसताना पदाचा गैरवापर करुन ही वाहने सोडली आहेत.दंड न घेता वाहन मुक्त करणे, वाहनाचा विमा नसताना वाहन मुक्त करणे, आॅनलाईन प्रणालीवर नसतानाही वाहन सोडणे, खासगी संवंर्गातील वाहने परस्पर मुक्त करणे, खटला विभागातील काही अभिलेख व तपासणी प्रतिवेदनाच्या तृतीय प्रत उपलब्ध न करणे आदी ठपके नागेश पाटील यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.काही अधिकाऱ्यांची मिलीभगतपावरा यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नागेश पाटील यांना कार्यालयातील काही अधिकारी मदत करीत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही किंवा माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्यास आरटीओतील अधिकारी व रोखपाल जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.
बनवाबनवी.... चक्क ‘आरटीओं’चे अधिकार वापरत ‘ई-चलन’मध्ये हेराफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 12:03 PM