लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी मनपा प्रशासनाने १४ अव्यावसायीक मार्केटमधील गाळेधारकांचा विचार हा झालाच पाहिजे. मनपाने बजाविलेली लाखोंचा बिलांचा भरणा या मार्केटमधील गाळेधारक करुच शकत नाही. त्यामुळे जुन्या बिलांच्या रकमेत १० टक्के वाढ करावी अथवा सरसकट बिले निर्लेखित करावेत अशी मागणी जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली.
येत्या महासभेत मनपा प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये व्यावसायीक व अव्यावसायीक मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपाने वेगळा विचार करण्याची गरज असल्याचेही डॉ.सोनवणे यांनी सांगितले. ठराव क्रमांक १३५ नुसार १४ व्यापारी संकुलांना अव्यावसायीक मार्केट म्हणुन मान्यता दिली आहे. त्यामुळे १४ अव्यावसायीक मार्केटमधील गाळेधारकांना देण्यात आलेल्या भाड्याचा रक्कमेत देखील घट करण्याची गरज आहे. मनपाने गाळेधारकांना दिलेली बिले अवाजवी आहेत. या मार्केटमधील गाळेधारकांनी ही रक्कम भरण्याचा विचार केला तरी गाळेधारकांना कर्ज घ्यावे लागेल व परिवाराचा उदरनिर्वाह देखील करणे कठीण होईल. २०१२ च्या बिलांमध्ये दरवर्षी १० टक्के वाढ करून त्यानुसार बिले स्विकारावी. तसे केल्यास गाळेधारक आपल्या चाव्या स्वखुशीने मनपात जमा करायला तयार आहेत असेही डॉ.सोनवणे यांनी सांगितले. राज्यातील इतर मनपांमध्ये देखील हा विषय असून, याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून हा विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरुच आहे.