कोरेाना आजाराचे सर्व थैमान सुरू असताना प्रतिकारक्षमतेबाबत अनेक चर्चा होत आहेत. यात काय खावे, काय खाऊ नये, काय करावे, अशा अनेक समजुती-गैरसमजुती समाजमाध्यमातून समोर येत आहेत. मात्र, दैनंदिन जीवन जगत असताना त्यात काही सकारात्मक बदल केल्यास आपण निरोगी आणि तणावमुक्त राहू शकतो, असा सल्ला शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिला आहे... त्यांनी सांगितलेली ही जीवनशैली....
सकाळी साधारण सहा वाजेपर्यंत उठावे.. लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी लवकर उठून शौचास जाणे, तेथून आल्यानंतर पाणी पिणे, व्यायाम करणे, व्यायाम करतानाही उन्हाळ्यात अधिक कष्टाचे व्यायाम टाळावे, वॉकिंग करू शकता, नियमित शारीरिक हालचाली कराव्यात, प्राणायाम, योग करावा. यानंतर साधारण ९ ते १०:३० वाजेपर्यंत तुमचा नाश्ता होणे आवश्यक आहे. नाश्ता कधीच टाळायचा नाही. कारण हा काळ ऊर्जेचा काळ असतो. तुमच्या पोटात अन्न असेल तरच तुमची प्रतिकारक्षमता चांगली. सकाळी सकाळी नाश्त्यात थालीपीठ खाऊ शकता, बाहेरचे व जंक फूड टाळावेत. दुपारचे जेवण हे साधारण एक ते दीड वाजेच्या आसपास घेऊ शकतात. दुपारचे जेवण हे नेहमी राजासारखे असावे, दुपारी मात्र थोडे हलके खावे. सायंकाळी ७ पर्यंत रात्रीचे जेवण घ्यावे. जेवणानंतर साधारण दोन तास झोपू नये. यामुळे पचन चांगले होते. रात्री हलके अन्न खावे.
विशेष काय घ्यावे
कोरेानासाठी प्रतिबंधक म्हणून तुम्ही सकाळी तुळस, अद्रक आणि थोडे मध यांचे गरम पाणी घेऊ शकता. हे नसेल तर कोमट दुधात हळद टाकून प्यावे, प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी तुम्ही गुळवेल, आवळा, ब्राह्मी, शतावरी, अश्वगंधा यांचे सेवन करू शकता. गरम पाण्याची सकाळी वाफ घेऊ शकतात. आयुष काढा घेऊ शकता. ग्रीष्म ऋतूत शुष्कपणा येत असल्याने आहारात तूप घ्यावे. दिवसातून सरबत, कैरीचे पन्हे सेवन करावे, ऋतूत येणारी फळे खावी, यात टरबूज घ्यावे. दिवसभर अधिकाधिक पाणी प्यावे. बाहेर जाताना काही खाऊन व भरपूर पाणी पिऊनच जावे.
कोरोनात प्रतिकारक्षमता तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. ज्यांची प्रतिकारक्षमता कमी त्यांना लवकर लागण होत आहे. त्यामुळे आपली प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी काही थोडे बदल आपल्याला आपल्या जीवनात करायचे आहेत. त्यामुळे तुमचे मनोबलही वाढेल व तुम्ही निरोगीही राहाल.
डॉ. मिलिंद कांबळे, सहायक प्राध्यापक, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय