लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील २० किमीचे रस्ते मनपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत झाले असून, या रस्त्यांवर लवकरात लवकर नव्याने काम सुरु करण्यात येणार आहे. मात्र, या रस्त्यांचे नव्याने काम करताना डांबरी ऐवजी सिमेंटचे रस्ते करण्यावर भर देणे गरजेचे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडेदेखील यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही महापौरांनी सांगितले.
शहरातील मुख्य ६ रस्त्यांवर मनपाकडून दुरुस्तीसाठी गेल्या तीन वर्षात कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे हे रस्ते तर सिमेंटचे करण्यात आले तर हा दुरुस्तीचा खर्च टाळता येईल अशी भूमिका घेत ‘लोकमत’ ने गेल्या आठवड्यात ६ रस्ते सिमेंटचे करण्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याच वृत्ताची दखल घेत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभुषण पाटील हे देखील सिमेंटच्या रस्त्यांसाठी आग्रही आहेत. बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेले २० किमीचे ६ रस्ते हे शहरवासियांसाठी महत्वाचे असून, मुख्य बाजारपेठ परिसरासह शहरातील मुख्य भाग जोडणारे हे रस्ते आहेत. त्यामुळे या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती करण्यापेक्षा एकाच वेळी जर सिमेंटचे चांगल्या दर्ज्याचे रस्ते करण्यात आले तर शहरातील रस्त्यांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यात मनपाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाची आर्थिक परिस्थिती बेताची नसून, राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्यास शहरातील रस्त्यांचा प्रश्न कायमचाच मार्गी लागणार आहे.
भुयारी गटार योजनेचे कामही ठरणार नाही अडसर
६ रस्ते ज्या भागात येतात त्याठिकाणी पाणी पुरवठा योजनेचे पुर्ण काम झाले आहे. तर भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम देखील पुर्ण झाले आहे. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील काम भविष्यात करण्यात आले तरी या रस्ते खोदण्याची गरज पडणार नाही. दरम्यान, सिमेंटच्या रस्त्यांबाबत राज्य शासनाकडे देखील पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती महापौरांकडून देण्यात आली आहे.