लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या या दोन वर्षात जिल्हा हिवताप कार्यालयाकडून लाखांवर रक्तनमुने संकलित करण्यात आले आहेत. मात्र, यात केवळ एकच हिवताप बाधित रुग्ण समोर आला आहे. यामुळे कोरोनाच्या या काळात हिवताप गायबच झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, आज जागतिक हिवताप दिवस असून याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे.
कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असताना शिवाय हिवताप, डेंग्यू अशा आजारांसारखीच कोरोनाची लक्षणे असल्याने रुग्णांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. अशा स्थितीत हिवतापाकडेही दुर्लक्ष करू नये, असेही आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका, औषध विक्रेत्यांच्या अथवा स्वत:च्या अल्प ज्ञानावर तापाकरिता परस्पर औषधी घेऊ नका, त्यासाठी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात / महापालिकेच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात हिवतापाची सोपी व मोफत रक्त तपासणी करुन घ्या, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण औषधोपचाराचा डोस घ्या, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अपर्णा पाटील यांनी केले आहे.
हिवतापाच्या रुग्णांनी ही दक्षता घ्यावी
हिवताप पसरविणारे डास आपण साठविलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात. पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या दुरुस्त करणे, त्यास झाकण बसविणे व गळती थांबविणे, दैनंदिन पाण्याच्या वापराकरिता घरामधील तसेच घराबाहेरील टाकी आठवड्यातून दोनदा पूर्ण रिकामी व स्वच्छ करून पुन्हा भरणे व झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचे सर्व पिंप व सर्व साठे डास प्रतिबंधक स्थितीत आणि व्यवस्थित झाकून ठेवणे, परिसरातील घराजवळील पाण्याची डबकी वेळीच बुजवा किंवा वाहती करा.
ही आहेत लक्षणे
भरपूर थंडी वाजून येते, रुग्णास मळमळल्यासारखे वाटते, काही वेळेस उलट्या होतात, खूप डोके दुखते, नंतर भरपूर घाम येऊन ताप उतरतो व गाढ झोप लागते. पुन्हा २४ तासानंतर ताप येऊन वरीलप्रमाणे त्रास होतो. खूप अशक्तपणा जाणवतो व रक्तक्षय होण्याची शक्यता असते. गर्भवती व बालकांना हिवतापापासून सर्वाधिक धोका संभवतो विशेषत: प्लाझामोडियम फॅल्सीपेरम या जंतूमुळे होणारा हिवताप हा मेंदूज्वर होण्यास कारणीभूत ठरतो व तो अत्यंत जीवघेणा मानला जातो. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.
नमूने असे केले संकलित
मार्च २०२० : ४४,४०९ रक्तनमुने तपासणी, बाधित ०
जानेवारी ते डिसेंबर २०१९ : १ लाख ३,२०२ बाधित १
जानेवारी ते डिसेंबर २०२० : ९८ हजार ९६४, बाधित ०
मार्च महिन्यात ३० हजार ८३४, बाधित ०