जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का पाळधी येथे स्थलांतरीत होणार होता, मात्र हा केंद्र शासनाचा विषय असल्याने हा धक्का आता माझ्याच मतदारसंघात असणाऱ्या शिरसोली येथे लवकरच स्थलांतरीत होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगावच्या मालधक्क्यामुळे समस्या निर्माण झाल्या होत्या. येथे होणारी वाहतूक समस्या, पिंप्राळा रेल्वे गेटजवळ होणारी वाहतूक कोंडी यामुळे अपघात देखील होत होते. अनेकदा निष्पाप नागरिकांचे बळी जात होते. त्यामुळे शहरवासीयांची सुटका व्हावी याकरिता हा रेल्वे धक्का पाळधी येथे स्थलांतरीत करण्यात येणार होता. त्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन हे दिल्लीत जाऊन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी जाऊन चर्चा करून आले होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील होते. चर्चेत मालधक्क्याला येणाऱ्या अडचणी व त्याबाबतचे पर्याय याविषयी चर्चा झाली होती. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यावर सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र मालधक्का हलविण्याचा विषय केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी नामंजूर केला होता. रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली. सदर मालधक्क्याचा विषय हा केंद्र सरकारचा आहे, त्यात कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे सूरत रेल्वे लाईनवर असलेल्या पाळधीला स्थलांतरीत होत असलेला मालधक्का हा आता मुंबई रेल्वे लाईनवर असलेल्या शिरसोली येथे स्थलांतरीत होत आहे. दोन्हीकडील भाग हे माझ्याच मतदारसंघात येतात. त्याचा आनंद असून त्यामुळे शिरसोली येथे मालधक्का आल्यावर त्याचा विकास केला जाईल अशी माहिती देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मालधक्का लवकरच शिरसोली येथे स्थलांतरीत होणार असल्याने शहरवासीयांची वाहतूक कोंडी, अपघात या मालिकेतून आगामी काळात सुटका होणार आहे.
जळगावच्या कृषी व औद्योगिक विकासामध्ये मालधक्क्याचे महत्व आहे. जळगाव शहरात वाहतुकीची अडचण पाहता हा मालधक्का*पाळधी ऐवजी आता शिरसोली येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
- पालकमंत्री गुलाबराव पाटील