लोकमत इफेक्ट
ग्रामसडक योजना : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर ठेकेदाराकडून हालचाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या ममुराबाद-धामणगाव रस्त्याचे डांबरीकरण तीन वर्षांपासून रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रकाशित केले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ममुराबाद गावाजवळील राज्यमार्ग ४२ ते धामणगाव- खापरखेडा गावापर्यंतच्या ४.५ किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. सुमारे २ कोटी ५४ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्यानंतर त्याद्वारे जवळपास सव्वाचार किलोमीटरचे डांबरीकरण व उर्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरण, तसेच आठ ठिकाणी लहान मोऱ्यांचे काम व हातेड नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम, संरक्षण भिंत, आदी कामे त्यातून प्रस्तावित आहे. काम सुरू होण्याची तारीख ३० ऑक्टोबर २०१८ असताना, वर्षभरात हे काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला देण्यात आली होती. प्रत्यक्षात संबंधितांकडून आजतागायत या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. हातेड नाल्याजवळ फक्त वाळू आणून टाकली. पुलाच्या कामाला साधी सुरुवातही झाली नाही, याकडे ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले. त्यानंतर ठेकेदाराकडून धामणगाव रस्त्याच्या कामासाठी जाड खडी, तसेच मुरूम आणून टाकण्यास सुरुवात झाली आहे. मजबुतीकरणानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार प्रतिनिधीने दिली.
--------------------------------------
फोटो-
ममुराबाद-धामणगाव रस्त्याच्या दैनावस्थेकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर ठेकेदाराने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी जाड खडी व मुरूम टाकला जात आहे. (जितेंद्र पाटील)