लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे वेळोवेळी गांभीर्याने लक्ष न दिल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीत चार ते पाच नियमित सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतानाही नवीन भरती प्रक्रिया रखडली आहे. अशा परिस्थितीत गावातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीला रोजंदारीवर मजूर मिळणेसुद्धा आता दुरापास्त झाले आहे. बसस्थानकासह गावातील मुख्य चौक व रस्त्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नाही. सगळीकडे प्लॅस्टिक कागद, कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मोकळ्या जागेत ग्रामस्थांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांना घरात बसणे कठीण होते. सार्वजनिक शौचालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही ‘डंपिंग ग्राऊंड’ निर्माण झाले असून त्याकडे ग्रामपंचायतीने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. कचऱ्याची समस्या वेळीच निकाली न काढल्यास गावात साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
फोटो कॅप्शन - ममुराबाद येथे बहुतांश वॉर्डात नियमित सफाईअभावी असे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.