लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त आचारसंहिता सुरू असली तरी गावात तिचे पालन करण्यात प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. जिकडेतिकडे राजकीय पुढाऱ्यांचा नामोल्लेख असलेले फलक कायम असून ते झाकण्याची किंवा काढण्याची तसदी कोठेच घेण्यात आलेली नाही.
निवडणूक मग ती लोकसभेची असोे की विधानसभेची, जिल्हा परिषदेची किंवा पंचायत समितीची, गावात विविध ठिकाणी लावलेल्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटनाचे शिलालेख त्याचप्रमाणे राजकीय फलक तात्पुरते झाकण्याची व्यवस्था केली जाते. आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होत आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी अक्षरशः डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले जाते. तसा प्रकार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोठेच आढळत नसून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांना चक्क केराची टोपली दाखविण्यात आली आहे. गावात राजकारण्यांचा स्पष्टपणे उल्लेख असलेले फलक सर्वत्र झळकत आहेत. ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्येही आचारसंहितेचे गांभीर्य शिल्लक राहिलेले नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना गावात काही ठिकाणी वित्त आयोगाच्या निधीतून सौरदिवे बसविण्यात आले आहेत. सौरदिवे कोणाच्या निधीतून किंवा प्रयत्नातून बसविण्यात आले ते समजण्यासाठी चौफेर पाट्या लावण्याची काळजीसुद्धा घेण्यात आली आहे. त्याची ग्रामस्थांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशासनाने आचारसंहितेचे धिंडवडे उडविल्याचे पाहून नाराजीदेखील व्यक्त होत आहे.
---------------------
फोटो-
ममुराबाद येथे ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही उभा करण्यात आलेला सौरदिवा आणि कोणाच्या निधीतून त्याचे काम झाले त्याबाबतचा फलक दिसत आहे. (जितेंद्र पाटील)