ग्रामस्थांचे लक्ष : राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात सुमारे ४३ उमेदवार असले तरी सहा ठिकाणच्या जागांकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण दोन माजी सरपंचांसह विकास सोसायटीतील आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी तिथे उमेदवारी केली आहे. त्यापैकी कोण निवडणुकीत बाजी मारतो त्याची सर्वांना उत्कंठा लागली आहे.
ममुराबादगावातील वॉर्ड एकमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव जागेसाठी माजी सरपंच हेमंत गोविंद चौधरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. उल्हास नारायण कोलते यांच्यात सरळ लढत रंगली आहे. हेमंत चौधरी यांचे वडील (कै.) गोविंद हरी चौधरी हेसुद्धा कधीकाळी ग्रामपंचायतीचे सरपंच व जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. वॉर्ड एकमध्येच सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष अनिल पाटील यांच्या पत्नी अलका अनिल पाटील यांनी उमेदवारी केली आहे. त्यांच्याविरोधात अनिता प्रभाकर ढाके व रंजना जितेंद्र ढाके यांनी अर्ज दाखल केले आहेत.
वॉर्ड दोनमध्ये सर्वसाधारण जागेसाठी माजी सरपंच अमर गंगाराम पाटील यांनी यंदा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना पोलीसपाटील आशा पाटील यांचे पती धनराज ज्ञानेश्वर पाटील यांनी आव्हान दिले आहे. वॉर्ड चारमध्ये अनुसूचित जाती राखीव जागेसाठी माजी सरपंच रमाबाई गुलाबराव सोनवणे यांचे चिंरजीव विलास सोनवणे यांची उमेदवारी आहे. त्यांच्या विरोधात विजय पितांबर सोनवणे व महेंद्र दिलीप सोनवणे यांचे अर्ज आहेत. पैकी महेंद्र सोनवणे यांनी अधिकृतपणे माघार घेतली नसली तरी विलास सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. वॉर्ड सहामध्ये अनुसूचित जमाती राखीव जागेसाठी माजी सरपंच भाग्यश्री मोरे यांचे वडील गोपालकृष्ण उखा मोरे यांची उमेदवारी असून, त्यांच्याविरोधात भोलेनाथ नागेश्वर माळी हे उमेदवार आहेत. याशिवाय वॉर्ड सहामध्येच सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी माजी सरपंच महेश सोपानदेव चौधरी यांच्या वहिनी सुनीता अनंत चौधरी यांची उमेदवारी आहे. त्यांच्याविरोधात विकास सोसायटीचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या वहिनी अश्विनी शरद पाटील यांची उमेदवारी आहे. पैकी सुनीता चौधरी यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद भूषविले आहे.
-------------------
सरपंचपदाकडे लागले सर्वांचे लक्ष
यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला आहे. तरीही अनेकांनी उद्या आरक्षण निघाल्यावर आपला हक्काचा उमेदवार त्यासाठी तयार पाहिजे म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगलीच कंबर कसली आहे. घरातील उमेदवार निवडून आणण्याकरिता निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसत आहे.
---------------------