लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी सहा वॉर्डात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा सुमारे २५८ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारून संबंधित उमेदवारांना चांगलीच चपराक दिली आहे. निवडणूक निकालानंतर त्याची सर्वत्र चर्चा असून अगदी कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना त्याचा मोठा फटका बसला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांची गोळाबेरीज आता सर्व वॉर्डात केली जात आहे. मोठ्या मताधिक्याने त्याचप्रमाणे काठावर मते मिळवून विजयी झालेले व पाच ते दहा मतांनी पराभूत झालेले उमेदवार जास्तकरून चर्चेचा विषय बनले आहेत.
वॉर्ड क्रमांक एक वगळता अन्य सर्व वॉर्डात प्रत्येकी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. विशेषतः वॉर्ड चारमध्ये सर्वाधिक ७३ मतदारांनी, त्याखालोखाल वॉर्ड सहामध्ये ६०, वॉर्ड पाचमध्ये ५० आणि वॉर्ड तीनमध्ये ४१ आणि वॉर्ड दोनमध्ये २६ मतदारांनी नोटाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अनिस भीकन पटेल हे सर्वाधिक ७२० मते मिळवून विजयी झाले आहेत. खालोखाल ६६८ मते माजी सरपंच अमर गंगाराम पाटील यांना त्याचप्रमाणे ६३५ मते एजाज अजित पटेल यांना मिळाली आहेत.
-------------
वॉर्डनिहाय ‘नोटा’ची मते
वॉर्ड एक - आठ
वॉर्ड दोन- २६
वॉर्ड तीन- ४१
वॉर्ड चार- ७३
वॉर्ड पाच- ५०
वॉर्ड सहा- ६०