लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतीने विविध व्यावसायिकांना दिले आहेत. स्थानिक व बाहेरगावाहून फळे, भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या विक्रेत्यांनाही यापुढे गावभर फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने सामूहिक संसर्गाला आळा घालण्यासाठी दत्त मंदिर चौकात नियमितपणे भरणारा फळे व भाजीपाला बाजार आता बसस्थानकालगतच्या उमानगरात मोकळ्या जागेत स्थलांतरित केला आहे. दरम्यान, भाजीपाला विक्रेत्यांना सोशल डिस्टन्स राखण्यासाठी एकमेकांत किमान पाच फुटाचे अंतर राखण्यासह ग्राहकांना चिन्हांकन केलेल्या जागेतच उभे करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
------(कोट)
गर्दी टाळण्यासाठी फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या स्थानिक व बाहेरगावच्या विक्रेत्यांना गावात फिरण्यास मनाई असल्याची सूचना ग्रामपंचायतीने दिली आहे. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर कारवाई होईल.
- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद