लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : आव्हाणे गावाकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याचे मंजूर झालेले काम सुरू होण्यापूर्वीच शेकडो डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असल्याचे वृत्त बुधवारी 'लोकमत'मध्ये प्रकाशित झाले. त्याची दखल घेऊन जळगावच्या उपवनसंरक्षकांनी सदर प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी पावले उचलली आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या ममुराबाद- आव्हाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात नसताना या रस्त्यालगतची शेकडो डेरेदार झाडे तोडण्यासाठी लाकूडतोडे मोठ्या संख्येने कार्यरत झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून निंब, बाभूळ, बोर आदी झाडांच्या लाकूड तस्करीला वेग आल्याचे दिसून आले आहे. सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अख्त्यारित असताना, दुतर्फा वाढलेली लहान व मोठी झाडे स्वतःच्या मालकीची असल्याचे दाखवून अनेकांनी त्यांचा मिळेल त्या पैशात सौदा केला आहे. लाकूडतोड्यांनीही कमी किमतीत मिळालेली अनेक वर्षे जुनी झाडे वखार चालकांना भरमसाठ किमतीत विकून चांगली कमाई साधली आहे. घडल्या प्रकाराची वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणतीच खबर नव्हती. या विषयी 'लोकमत'ने सचित्र वृत्त प्रकाशित केले. दरम्यान, चौकशीनंतर संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
-------------------
(कोट)
ममुराबाद- आव्हाणे रस्त्यावरील झाडांच्या कत्तलीची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- विवेक होशिंग, उपवनसंरक्षक, जळगाव