लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : येथील ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागांतील १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे ७७.९१ टक्के मतदान झाले. रात्री सात वाजेपर्यंत सुरु असलेली मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
गावात यंदा सहा ठिकाणी आठ मतदान केंद्रांची व्यवस्था निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आली होती. सकाळी साडेसातला वेळेवर मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन ते तीन तासात मतदारांची फारशी गर्दी नव्हती. दुपारपर्यंत मतदानाचा वेग जेमतेमच राहिला. साडेतीनच्या सुमारास प्रभाग १ व ५ वगळता अन्य प्रभागांमध्ये मतदारांचा फारसा उत्साह दिसलाच नाही. विशेषतः प्रभाग चारमध्ये मोठ्या मुश्किलीने ४८ टक्के मतदान झाले होते. संबंधित उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या जीवाची घालमेल त्यामुळे चांगलीच वाढली होती. मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात होते. वयोवृद्ध व अपंग मतदारांना केंद्रांपर्यंत आणून सोडण्यासाठी रिक्षाची व्यवस्थाही काही उमेदवारांनी केली होती. दरम्यान, मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहून मतदारांकडे मतांचा जोगवा मागणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमुळे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने तो लगेच निवळला. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी मतदान केंद्राच्या ठिकाणी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली. निवडणूक अधिकारी नीलेश पाटील यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
----------------
शेवटच्या अर्ध्या तासात उसळली गर्दी
विविध प्रभागातील मतदान केंद्रांवर शेवटच्या अर्ध्या तासात मतदारांची एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यामुळे मोठी तारांबळ उडाली. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही प्रभागांत मतदानाची प्रक्रिया सुरू ठेवावी लागली. प्रभाग क्रमांक चारमध्ये तर रात्री सात वाजेपर्यंत मतदान सुरु होते.