लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : विदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी साधारण साडेसातच्या सुमारास दोन मोटारसायकलींची जोरदार धडक झाली. अपघातात बालकासह चारजण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ममुराबाद गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेश राज्यातील दुचाकी (एमपी १०, एमवाय- ५७२५) घेऊन विदगावकडे जाणारे आदिवासी पावरा जमातीचे मजूर आणि विदगावकडून जळगावकडे भंगार घेऊन येणाऱ्या व्यावसायिकाची दुचाकी (एमएच १९, एजी- ०२३० ) यांच्यात धडक झाली. अपघात घडला तेव्हा रस्ता एकदम निर्मनुष्य होता. अंधारात जखमी बराचवेळ रस्त्याच्या कडेला विव्हळत पडले होते. अपघात एवढा भीषण होता की त्यात दोन्ही वाहनांवरील व्यक्ती जबर जखमी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. मोटारसायकलींचे हेड लाईट, पुढची चाके आणि शॉकअप चक्काचूर झाले होते. याशिवाय भंगार व्यावसायिकाच्या गाडीला बांधलेल्या गोणीतील काचेच्या रिकाम्या बाटल्या फुटून त्या रस्त्यालगत विखूरल्या होत्या. दरम्यान, जळगाव शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल नेतलेकर तसेच नितीन तामयचे हे काही कामानिमित्त विदगावकडे जात होते. दोघांनी तातडीने रूग्णवाहिका बोलवून जखमींना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदत केली. घटनास्थळी पोलीस यंत्रणा रात्री उशिरापर्यंत दाखल झालेली नव्हती.
---------------
फोटो-
ममुराबाद-विदगाव रस्त्यावर घडलेल्या अपघात दोन्ही दुचाकींची अशी अवस्था झाली. (जितेंद्र पाटील)