लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद: परिसरातील तुरखेडा शिवारात जळगाव तालुका पोलीस ठाणे अंतर्गत गेल्या साडेतीन वर्षांपासून चौकी उभारण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूकच होत नसल्याने चौकी केवळ नावालाच राहिली असून, तिचा कोणताही उपयोग आजतागायत होऊ शकलेला नाही.
जळगाव तालुक्याच्या उत्तरेस तापी नदीच्या खोऱ्यात कोठेच पोलीस चौकी किंवा मदत केंद्र अस्तित्वात नसताना बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता ममुराबादहून विदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौकी उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्याची दखल घेऊन उद्योजक अनिल मंडोरे यांच्या आर्थिक सहकार्यातून इंदूमोती जिनिंग फॅक्टरीच्या कंपाउंडला लागून सुसज्ज पोलीस चौकी बांधण्यात आली. तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते मे २०१७ मध्ये उद्घाटन झालेल्या चौकीवर सुरुवातीच्या काळात पोलीस थांबू लागल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधानही व्यक्त करण्यात आले; परंतु नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर पोलीस चौकीकडे कालांतराने कोणीच फिरकत नसल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी कपाळाला हात लावला. चौकीसाठी झालेला खर्च वाया जाण्याची चिन्हे निर्माण झाली. दरम्यान, पोलीस चौकी ओस पडल्याने त्या भागातील कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ बनली. उद्योजक मंडोरे यांनी पोलीस चौकी उभारण्यासाठी सहकार्य केले होते; मात्र त्यांच्याच जीवावर काही लुटारू उठले. त्या घटनेनंतर परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण पसरले असताना अजूनही चौकीवर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. त्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
------------------------
फोटो-
ममुराबाद - विदगाव रस्त्यालगत बांधलेली पोलीस चौकी गेल्या काही वर्षांपासून ओस पडली आहे. (जितेंद्र पाटील)