लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गावात गेल्या काही महिन्यात सुमारे ४६ कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, कोविड लसीकरणासह खबरदारीच्या उपाययोजनांवर वेळीत भर दिल्याने आता गावात एकही कोरोना संक्रमित रुग्ण नसल्याने गावकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. लसीकरणातही गावाने आघाडी घेतली आहे.
गेल्या वर्षी ममुराबाद गावात तब्बल ९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. सहा जणांना जीव गमवावा लागला होता. त्या तुलनेत यंदा कोरोनाचे संक्रमण आटोक्यात असले तरी ३० एप्रिलअखेर नवीन ४६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यावर भर देण्यात आला. ग्रामपंचायतीकडूनही जंतुनाशकाच्या फवारणीसह जनजागृतीसाठी पावले उचलण्यात आली. आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर वेळीच भर देण्यात आल्याने गावात सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही.
३८८ जणांचे लसीकरण
धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आयोजित लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन ममुराबाद येथील सुमारे ३८८ ग्रामस्थांनी आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ३१२ तसेच दुसऱ्या डोस घेतलेल्यांची संख्या ७६ आहे. लसींचा नवीन साठा उपलब्ध झाल्यानंतर ममुराबाद येथील आरोग्य उपकेंद्रातच कोविड लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.