लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्याकरिता तब्बल २४ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल करून लक्ष वेधून घेतले असून, राजकारणात नारीशक्ती मोठ्या संख्येने सक्रिय झाल्याचे पाहून मतदारांमध्येही कोण बाजी मारते याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या सहा वाॅर्डांत महिलांच्या सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटातून नऊ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करून विविध वॉर्डांत २३ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय वॉर्ड क्र. ५ मध्ये सर्वसाधारण जागेवर एका महिलेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशा प्रकारे सुमारे २४ महिला एकावेळी रिंगणात उतरल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे एखादा अपवाद वगळता बहुतांश सर्व महिला यंदा प्रथमच नशीब आजमावताना दिसत असून, त्यांच्यात वेगळाच उत्साह निर्माण झाल्याचे जाणवत आहे.