लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : नियमितपणे सफाई होत नसल्याने गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गटारींची संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाणीपट्टी व घरपट्टी करांची थकबाकी सव्वाकोटींपेक्षा जास्त असल्याने त्याचा विपरित परिणाम ग्रामपंचायतीकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांवर झाल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात काही ग्रामस्थ हे करांचा नियमित भरणा करीत असतानाही त्यांच्यावर कर न भरणाऱ्यांमुळे अन्याय होताना दिसतो. विविध वॉर्डातील रहिवाशांनी स्वच्छतेबाबत तक्रारीदेखिल केल्या आहेत. मात्र, त्याबाबतीत ग्रामपंचायतीकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना होत नसल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायतीला गेल्या काही महिन्यांपासून पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने समस्या घेऊन गेल्यानंतर त्यांची सोडवणूक करण्यासाठी कोणीच जबाबदार अधिकारी ग्रामपंचायतीत दिसत नाही. गावातील बहुतांश भागात गटारीची दैनंदिन साफसफाई होत नसल्यामुळे त्या तुंबल्या आहेत. काही ठिकाणी जुन्या गटारी फुटल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे गंभीर बनला आहे. डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे आबालवृद्धांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
----------------------------
ग्रामपंचायतीत एकच सफाई कर्मचारी
ममुराबाद ग्रामपंचायतीत सन २००० पूर्वी तब्बल १० सफाई कर्मचारी कार्यरत होते. सद्यःस्थितीत फक्त एक महिला कर्मचारी कार्यरत असून काही महिन्यांपासून एकही नवीन सफाई कर्मचारी भरती करण्यात आलेला नाही. सांडपाण्याच्या गटारी व सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता करण्यासाठी त्यामुळे ग्रामपंचायतीला रोजंदारी मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे. वेळेवर पगार होत नसल्याने गेल्या काही वर्षात चार सफाई कर्मचाऱ्यांनी कंटाळून नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आहे. दोन कर्मचारी मयत झाले असून तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.
----------------------------------