लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गावाला तापी नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या सामूहिक योजनेच्या थकीत वीजबिलाची रक्कम सुमारे ५० लाखांपर्यंत पोहोचल्याने महावितरणकडून ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, थकीत बिल वेळेवर भरले न गेल्यास वीजपुरवठा केव्हाही खंडित होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाच्या तोेंडचे पाणीच पळाले आहे.
ममुराबाद व परिसरातील नांद्रा खुर्द, खापरखेडा, धामणगाव, आवार व तूरखेडा आदी काही गावांसाठी सुमारे ३५ वर्षांपूर्वी तापी नदीवर सामूहिक योजना कार्यान्वित करण्यात आली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेली सदरची योजना गेल्या वर्षभरापासून ममुराबाद ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाणीपुरवठा योजनेसोबत कित्येक वर्षांपासून थकीत असलेले महावितरण कंपनीचे बिलसुद्धा ग्रामपंचायतीच्या गळ्यात टाकण्यात आले आहे.
विशेषतः जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्याद्वारे आपल्या अंगावरील घोंगडे झटकण्याचा प्रकार पद्धतशीरपणे केल्याचे दिसून आले आहे. संबंधित विभागाने अनेक वर्षे थकीत वीजबिल भरण्यास काणाडोळा केला, तेव्हा महावितरणनेही काहीच कारवाई केली नाही.
ग्रामपंचायतीकडे जेमतेम वर्षभरापासून पाणी योजना आली असताना मात्र आता महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे महावितरणने बजावलेली बिले अजूनही जिल्हा परिषदेच्या नावाची आहेत.
------------------------
आता १० लाख रुपये तरी भरा...
ग्रामपंचायतीला महावितरणकडून २५ लाख ७३ हजार, २३ लाख ६५ हजार तसेच २ लाख ४५ हजार रुपयांची तीन बिले बजावण्यात आली आहेत. त्यापैकी जवळपास ५० लाख रुपयांची थकबाकी फक्त नांद्रा येथील पाणीपुरवठा योजनेची आहे, तर उर्वरित रक्कम ममुराबाद येथील गावहाळ विहिरीच्या पंपाची असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी हफ्ते पाडून देण्याची मागणी केल्यावर जळगाव ग्रामीण उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी किमान १० लाख रुपये भरण्यास संमती दिली आहे. तेवढ्या रकमेची तजवीज करताना तरीही ग्रामपंचायतीच्या चांगलेच नाकीनव आले आहेत.
---------------------------------
(कोट)....
नांद्रा खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेचे थकीत बिल तातडीने भरण्याविषयी महावितरणकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. सदरचे बिल वेळेवर न भरल्यास योजनेचा वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाईसुद्धा होऊ शकते. मात्र, ग्रामस्थांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी कर भरल्यास कारवाई टळेल.
- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद
-----------------