लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गेल्या सव्वा वर्षापासून पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने गावाचा कारभार आधीच दिशाहीन झाला आहे. त्यातभर प्रभारी ग्रामसेवकाने दांडी मारल्याने आता ग्रामपंचायतीची मासिक सभाही तहकूब करण्याची वेळ येऊ लागली आहे. सरपंचांसह अन्य पदाधिकारी त्यामुळे हतबल झाले असून पंचायत समितीने फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे.
सुमारे १२ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ममुराबाद येथील ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नाही. सावखेडा खुर्द व सावखेडा बुद्रुक या गावांचा एकत्रित कारभार पाहणाऱ्या ग्रामसेवकाकडे पदभार सोपविण्यात आला आहे. प्रभारी ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे मूळ नेमणुकीच्या गावी जास्तकरून थांबतात. ममुराबाद गावी आठवड्याातून दोन दिवस आले तरी ते दुपारनंतरच येतात. त्यातही येतील किंवा नाही, याची कोणतीच शाश्वती नसते. त्यामुळे सरपंचांसह सदस्य व कर्मचाऱ्यांकडून त्यांना दूरध्वनीवरून त्याबद्दल विचारणा करूनच पुढील कामांचे नियोजन केले जाते. १४ व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. त्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करावयाच्या कामांचे अजुनही कोणतेच नियोजन होऊ शकलेले नाही. घरपट्टी व पाणीपट्टी करांच्या थकबाकीच्या डोंगर कमी करण्यासाठी धडक वसुली मोहीम राबविण्याची गरज असतांना त्यासाठीही कोणतेच पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी नवीन पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
----------------
(कोट)
ममुराबाद ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नेमण्याची मागणी पंचायत समितीकडे केली आहे. त्यांच्याकडून येत्या ३० मार्चपर्यंत नवीन अधिकारी देण्याचे आश्वासन मिळाले असून त्यानंतरच ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसूत्रता येऊ शकेल.
- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद