जळगाव : भरधाव जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील स्वप्नील सुरेश जोशी (३५, रा. देविदास कॉलनी) हे जागीच ठार झाले. जोशी हे आपल्या किराणा दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपर चालकाच्या बेपर्वाईने व्यावसायिकाचा जीव गेला. हा अपघात मंगळवार, ११ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाच्या पुढील उड्डाणपुलावर झाला. डंपर चालक वाहन सोडून फरार झाला.
स्वप्नील जोशी यांचे प्रेमनगरमध्ये किराणा दुकान आहे. मंगळवारी दुपारी ते आकाशवाणी चौकाकडून मानराज पार्ककडे दुचाकीवर (क्र. एमएच १९, बीएस ४१३) जात होते. आकाशवाणी चौक ओलांडून उड्डाणपुलावर ते पोहचले त्याच वेळी मागून आलेल्या भरधाव डंपर (क्र. एमएच १९, सीवाय ५७८८) दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार लागून ते खाली कोसळले. ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकीस्वाराच्या कपाळावर जखम होण्यासह कपाळाचा भाग मध्ये दाबला गेला. तसेच दोन्ही कानातून रक्तस्त्राव सुरू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पो.कॉ. हर्षद गवळी, चालक दीपक पाटील हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी दुचाकीस्वाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी मयत घोषित केले.
चालक फरारअपघात होताच डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. रामानंद नगर पोलिसांनी डंपर व दुचाकी पोलिस ठाण्यात जमा केली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नऊ महिन्यांच्या मुलांचे पितृछत्र हरविलेस्वप्नील जोशी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. मुलगा ओजस हा चार वर्षाचा असून मुलगी समीक्षा ही तर नऊच महिन्यांची आहे. एवढ्या लहान वयात मुलांचे पितृछत्र हरविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वडील निवृत्त अधिकारीमयत स्वप्नील यांचे वडील पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच वाहतूक शाखेचे अनेक कर्मचारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचले होते.
डंपर उठले जीवावरशहर व परिसरातून दररोज दिवसभर महामार्गासह वेगवेगळ्या रस्त्यांवरून भरधाव डंपर जात असतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ते नागरिकांच्या जीवावर उठल्याचा आरोप केला जात आहे. सध्या वाळू उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचीही ये-जा सुरू असते. शिवाय वाळू उपसा करून आल्यानंतर पुन्हा वाळू भरण्यासाठी रिकामे डंपर वेगाने जात असल्याचे दररोज दिसून येते. यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.