जळगाव : गैरवर्तन आणि सतत कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करत असल्याचा ठपका ठेवत ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक तथा व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन उत्तमराव बारी यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांनी १९ जानेवारी रोजी केली आहे.
प्रा. नितीन बारी हे सन १९९८ मध्ये ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले होते. मध्यंतरी त्यांनी काही चुका केल्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना मेमो दिला होता. त्यानंतर त्यांची महाविद्यालयस्तरावर चौकशी सुरू होती. अखेर प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त होवून त्यामध्ये बारी यांच्यावर गैरवर्तन व सतत जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार १९ जानेवारी रोजी संस्थाध्यक्ष यांनी बारी यांच्यावर निलंबिनाची कारवाई केली. ‘लोकमत’ने संस्थेच्या अध्यक्षांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
विभागीय चौकशी होणार
प्रा. नितीन बारी यांची विभागीय चौकशी सुध्दा केली जाणार आहे़ त्याआधी त्यांना बचावासाठी खुलासा सादर करण्यासाठी नोटीस देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतरच विभागीय चौकशी केली जाईल. प्रा.नितीन बारी हे व्यवस्थापन व अधिसभा सदस्यपण असून ते एन-मुक्ता संघटनेचे अध्यक्ष सुध्दा आहेत.
बैठका, सभांबाबत कळवू नये
बारी यांचे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावरील सदस्यत्व स्थगित करण्यात यावे, असे पत्र ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांनी कुलगुरू प्रा़पी़पी़पाटील पाठविले होते. या पत्राची दखल घेवून विद्यापीठाने त्यांना अधिसभा, व्यवस्थापन परिषद तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या समित्यांच्या सभा, बैठकींसाठी निलंबन काळात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येवू नये, असे परिपत्रक काढले आहे.
कोट
निलंबनाच्या प्रकरणासंदर्भांत माझे जे ही म्हणणे आहे, ते मी लवकरच संस्थेकडे मांडणार आहे.
- प्रा. नितीन बारी.