स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे मनुष्यात विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजेच शिक्षण. परंतु अशा पूर्णत्वाच्या प्रगटीकरणाच्या संधी पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष कार्यानुभवातूनच मिळतात. किल्ले बनवा स्पर्धा ख:या अर्थाने व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण होय. सध्याच्या युगात अशा प्रकारचे व्यवस्थापकीय कौशल्य विकासासाठीही किल्ले बनवा स्पर्धासारख्या स्पर्धाची संख्या वाढणे क्रमप्राप्त आहे. व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकाच्या ठायी काही कौशल्ये, योग्यता व स्वयंपूर्णता असणे आवश्यक ठरते. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात साकारणे, मनुष्यबळ हाताळण्याचे, तांत्रिक कौशल्य, निर्णय क्षमता, सामाजिक भान, मार्केटिंग, आर्थिक गणित हाताळण्याच्या कामासाठी लागणा:या संसाधनांचे योग्य नियोजन यासारखी कौशल्ये व्यवस्थापकाला यशस्वितेसाठी उपयुक्त ठरतात. व्यवस्थापनाच्या पदव्या घेऊनही चांगल्या व्यवस्थापकांची वानवा असणे हे शिक्षण पद्धतीचे अपयश म्हणावे लागेल. याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या विद्याथ्र्याची प्रत्यक्ष अनुभवासाठी मेहनत करण्याची तयारी नसते. अभ्यासक्रमावर आधारित प्रकल्प निर्माण करीत असतानाही मोठय़ा प्रमाणावर पुनरावृत्तीच आढळते. मनुष्यबळ हाताळण्याचे कौशल्य स्पर्धेत पाच स्पर्धकांचा संघ होता. संघातील सदस्यांना मर्यादित कालावधीत किल्ले बनवायचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण करावयाचे होते. प्रत्येकाच्या गुण, दोष व कौशल्यांचा विचार करून कामाची विभागणी व नियोजन केले होते. संघ नायकाने अशा प्रकारचे नियोजन म्हणजेच मनुष्यबळ हाताळण्याचे व्यवस्थापकीय कौशल्य. तांत्रिक कौशल्य आपल्या व्यवसायामधील तांत्रिक कौशल्य आत्मसात केल्याशिवाय व्यवस्थापक यशस्वी होऊ शकत नाही. येथे स्पर्धकांच्या तांत्रिक कौशल्याचा पुरेपूर उपयोग दिसला. कोणी माती कामात, तर कोणी साधन गोळा करण्यात, तर कोणी सजावटीच्या वस्तू तयार करण्यात मग्न होता. नववीत शिकणा:या मुलांच्या एका संघाने किल्ला साकारताना त्याचे ड्रॉईंग कागदावर बनविले होते. संकल्प चित्र, मोजमापे तयार केलेली होती. प्रेक्षकांच्या प्रथम पसंतीस असलेला शिवनेरी किल्ला परीक्षकांना भावला. मात्र किल्ल्यातील आवश्यक असलेल्या तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळणा:या देवगिरी किल्ल्याला त्यांनी प्रथम पसंती देणे उचित समजले. विचार करण्याचे कौशल्य संघातील प्रत्येकाची विचार करण्याची आपली पद्धत होती. त्यांच्या मनातील कल्पना, विचार तो इतरांशी बोलत असे. विशेषत: किल्ल्यातील बुरुज, रस्ता, पाय:या, तोफा, मंदिर, कागदापासून मावळे, दरवाजा व अन्य इतर गोष्टी साकारताना हे कौशल्य दिसून आले. सहका:याच्या कल्पनांचा सकारात्मक विचार येथे प्रमुखांकडे दिसला. त्यामुळे त्यांच्यात शेवटर्पयत उत्साह होता. निर्णय घेण्याचे कौशल्य किल्ला साकारण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध होते. त्यातील योग्य पर्याय निवडण्याची जबाबदारी स्पर्धकांची होती. त्यासाठी मर्यादित काळाचे भान ठेवणे गरजेचे होते. हा निर्णय व्यावहारिक, परिस्थितीनुरूप व अभ्यासांती घेतला जात होता. जेथे निर्णय भावनेच्या आधारावर वा अपूर्ण माहितीवर आधारित होता, तेथे संघाला अडचणी आल्या. एखादा निर्णय चुकला तरी करून बघू, म्हणून वेळेवर निर्णय घेणारे यशस्वीच ठरले. एका संघाने प्रतापगड करायचे ठरविले, पण प्रत्यक्षात साकारताना मात्र रायगड तयार झाला. मला वाटते निर्णय क्षमतेचे एक उत्तम उदाहरण ठरेल. आजचा व्यवसाय ग्राहकाभिमुख व समाजाभिमुख आहे. व्यवस्थापकाला त्यासाठी सामाजिक भान आवश्यक असते. तसेच दूरदृष्टीही महत्त्वाची होती. किल्ले साकारताना या दोन्ही गोष्टी लक्षात येत होत्या. कारण प्रत्येक जण पर्यावरण, प्रदूषण व स्वच्छता याबाबत जागरुक होता. किल्ला किमान पाच दिवस ठेवायचा असल्याने व मिळालेली माती काळी असल्याने तिच्या गुणधर्मानुसार तडे लवकर पडतील, यासाठी गोणपाट वा कापडाचा वापर होता. सजावट करतानाही रांगोळी, पालापाचोळा आदींचा सुयोग्य वापर होता. एका संघाने जंजिरा किल्ला बनवला. हा जलदुर्ग असल्याने सर्वबाजूने पाणी आवश्यक होते, ते लवकर जमिनीत जिरू नये यासाठी प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला होता. या पाण्यात होडय़ा सोडल्या होत्या. त्या कागदाच्या बनविलेल्या होत्या. पाण्यात राहून त्या खराब होतील म्हणून होडय़ांच्या खालच्या बाजूस आईस्क्रीमच्या काडय़ांचा कल्पक वापर केलेला दिसला. व्यवसायाच्या यशस्वितेसाठी विपणनाचे कौशल्यही महत्त्वाचे ठरते. हे कौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेत दिसून आली. आपला किल्ला चांगला आहे हे सांगण्याचा प्रत्येक संघाने व त्यातील प्रत्येक स्पर्धकाने पूर्ण प्रय} केला. कधी भावनांना हात घालत, तर कधी आपल्याकडील माहितीने. स्पर्धेत सहभागी मुलांमध्ये या कौशल्यांच्या मर्यादा होत्याच. त्या वयोगटाप्रमाणे प्रगल्भ होताना दिसत होत्या. मात्र कोणीही परिपूर्ण नाही आणि प्रत्येकाचा व्यवस्थापकीय कौशल्य विकासाचा हा प्रवास सुरू असल्याने किल्ले बनवा स्पर्धेने ही संधी उपलब्ध करून दिली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
व्यवस्थापनाचे तंत्र व मंत्र शिकविणारी किल्ले बनवा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 6:42 PM