मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : देवदर्शनानंतर संतांचे दर्शन झाल्याशिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, असा एक प्रवाह आहे. म्हणूनच रविवारी कामिका भागवत एकादशीनिमित्ताने श्री संत मुक्ताई दर्शनासाठी भाविकांच्या मांदियाळीचा जनसागर श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर येथे जमला होता. पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि भर पावसात दर्शनाची ओढ घेऊन झपाझप पाय टाकत मैल दर मैल अंतर पार करीत पायी दिंड्या येथे पोहचत होत्या.यंदा श्री क्षेत्र कोथळी येथे दर्शन बारीत एका वेळेस किमान १० हजार भाविक रांगेत उभे होते, तर ही दर्शनबारी मुक्ताई मंदिरापासून थेट नवे कोथळी-चांगदेव रस्त्यापर्यंत लागली होती. हा दर्शनासाठी लागलेल्या रांगेचा उच्चांक मोडणारा होता तर पूर्वानुुमान व अपेक्षेपेक्षा जास्त भाविक आल्याने आयोजकांची दमछाक होत होती. एक बाजूची दर्शन रांग करून मुखदर्शनाने भविकांची गर्दी कमी करण्याचे नियोजन स्वयंसेवक करीत होते. गर्दीमुळे येथे आलेल्या पायी दिंड्यांचे मंदिर परिक्रमासाठी मोठी कसरत होत होती.पंढरीची वारी जायाचिये कुळी, त्यांची पाय धुळी लागे मजआषाढी एकादशीला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनानंतर संत दर्शन झाल्याशिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. यानिमित्ताने दरवर्षी आषाढीसाठी पंढरपूर जाणारे भाविक विठ्ठल दर्शनानंतर येणाऱ्या परतीच्या एकादशीला परिसरातील संतांच्या दर्शनानंतर आषाढी वारी पूर्ण झाल्याचं आनंद मिळवतात. अशात परतीच्या एकादशीला वारकरी संत शिरोमणी संत मुक्ताई दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक येथे दाखल होतात. यंदा दशमीलाच मोठ्या संख्येने भाविकांची येथे गर्दी झाली. मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांनी पहाटे काकड आरतीपासून दर्शनासाठी गर्दी केली. दर्शनासाठी लागलेली रांग अगदी मुक्ताई मंदिरापासून थेट चांगदे रस्त्यापर्यंत पोहोचली. एका भाविकाला दर्शन घेण्यासाठी किमान चार ते पाच तास वेळ लागत होता. अनेक भाविक गर्दीमुळे मुखदर्शन घेऊन समाधान व्यक्त करीत होते. भाविकांची गर्दी सातत्याने वाढत होती. जेवढे भाविक दर्शन आटोपून परतत होते तेवढ्याच संख्येने नवीन भाविक दाखल होत होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत भाविकांची मांदियाळी येथे कायम होती. पहाटे प्रलहाद महादेव धुराळे यांच्या हस्ते महापूजा पार पडली, तर प्रल्हाद महाराज सुळेकर यांचे कीर्तन पार पडले. तसेच नवीन मुक्ताई मंदिरावर रवींद्र पाटील आणि ज्ञानेश्वर हरणे यांच्या हस्ते महापूजा झाली.६० ते ६५ दिंड्याएकादशीनिमित्त यंदा पंचक्रोशीतील ६० ते ६५ दिंड्या येथे दाखल झाल्या होत्या. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या येथे आल्या होत्या. चिंब पावसात पायी चालणारे वारकरी मुक्ताई व विठू नामाचा जयघोष करीत दिंड्यांनी नगर प्रदक्षिणा केली.
मुक्ताई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 3:52 PM
देवदर्शनानंतर संतांचे दर्शन झाल्याशिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, असा एक प्रवाह आहे. म्हणूनच रविवारी कामिका भागवत एकादशीनिमित्ताने श्री संत मुक्ताई दर्शनासाठी भाविकांच्या मांदियाळीचा जनसागर श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर येथे जमला होता.
ठळक मुद्देभर पावसात दर्शनाची ओढझपाझप पावले टाकत, मैल दर मैल अंतर पार करीत दिंड्या दाखलदर्शन बारीत एका वेळेस किमान १० हजार भाविक रांगेतदर्शनबारी मुक्ताई मंदिरापासून थेट नवे कोथळी-चांगदेव रस्त्यापर्यंतदर्शनासाठी लागलेल्या रांगेचा उच्चांक मोडणाराअपेक्षेपेक्षा जास्त भाविक आल्याने आयोजकांची दमछाकपंचक्रोशीतील ६० ते ६५ दिंड्या दाखल