ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 30 - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांची मानस कन्या ‘मंगल’(दिव्यांग) व योगेश (रा.रावेर) यांचा विवाह सोहळा रविवारी रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या पुढाकारातून व सर्व धर्मिय हजारो जळगावकरांच्या साक्षीने थाटात झाला.
मंगल ही पापळकर यांची १९वी मानस कन्या असून तिचा विवाह हा एक राष्ट्रीय महोत्सव म्हणून करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी करण्यात आली होती. या राष्ट्रीय महोत्सवातून आशेचा किरण निर्माण करणा-या घोषणाही झाल्याने दिव्यांगांच्या आयुष्यात परिवर्तन करणारा हा विवाह ठरू पाहत आहे.
या विवाह सोहळ्यास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आनंदराव आडसूळ, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, संजय सावकारे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे संचालक ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, रोटरी क्लबचे गव्हर्नर महेश मोकालकर आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.
संध्याकाळी विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींनी बेवारस दिव्यांगांच्या आजीवन आश्रयासाठी कायदा करण्यासाठी विधानसभा, विधानपरिषद तसेच लोकसभेत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिल्याने हा विवाह सोहळा दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा ठरला.
या विवाह सोहळ्यात मुलीचे काका म्हणून सुरेशदादा जैन व महापौर नितीन लढ्ढा यांनी आंतरपाट धरला व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कन्यादान केले.