लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अनेक दिवस रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी शहराध्यक्षपदी अखेर मंगला पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंगला पाटील यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदांसाठी काही महिन्यांपूर्वी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्या वेळीही नियुक्ती न झाल्याने यावरून पक्षात रस्सीखेच सुरू होती. हे पद पक्ष रिक्त का ठेवत आहे, असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर या पदावर मंगला पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, नेत्यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधणीसाठी आपण प्रयत्नशील राहाल, असा विश्वास या निवडीच्या पत्रात प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.