जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कथीत संभाषणाचा पर्दाफाश करण्याचा दावा करणाऱ्या मनीष भंगाळे याने पुन्हा नवीन आरोप करीत थेट राष्ट्रीयकृत बँकांनाच लक्ष केले. बँकेचे अधिकारीच भ्रष्टाचार करून खातेदारांच्या खात्यांशी छेडछाड करीत असल्याने बँक खाते सुरक्षित नसल्याचा दावा भंगाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केला. मात्र ठोस पुरावे व बँकांशी पत्रव्यवहार केलेले कागदपत्रे नसल्याने पुन्हा एकदा नवीन ‘ड्रामा’ समोर आला.तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या भ्रमणध्वनीवर पाकिस्तानातून दूरध्वनी येऊन खडसे यांचे पाकिस्तानात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा करीत खळबळ उडवून दिली होती. त्या दरम्यान भंगाळे यांनी जळगावातही पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी तर पोलीस यंत्रणाही कामाला लागली होती. मात्र नंतर प्रत्यक्षात काहीच सिद्ध झाले नाही.त्यानंतर शुक्रवारी शहरातील माध्यमांना पत्रकार परिषदेचे निमंत्रण देऊन बँक आॅफ इंडिया व स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेधारकांचे खाते सुरक्षित नसल्याचा दावा केला. प्रथम सर्वच पत्रकार थक्क झाले. यामध्ये मनीष भंगाळे यांनी त्यांचे वडील लीलाधर भंगाळे यांच्या खात्याचा संदर्भ दिला.त्यात भंगाळे यांचे म्हणणे आहे की, लीलाधर भंगाळे हे निवृत्त अधिकारी असून त्यांचे बँक आॅफ इंडियाच्या मैसाना शाखेत (गुजराथ) निवृत्ती वेतनाचे खाते आहे. या खात्याच्या नावे बँक अधिकारी वजा (मायनस) ६४ हजार ४४२ रुपये असल्याचे सांगून ते भरावे लागणार असल्याचा तगादा लावत आहे. स्टेट बँकेने हे खाते बंद केल्याचे बँक सांगत असल्याचे भंगाळे म्हणाले. त्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडिया ही बँक आॅफ इंडियाचे खाते कसे बंद करू शकते, असा सवाल उपस्थित केला. या बाबत पत्रकारांनी कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे नसून आपण टिष्ट्वट केल्याचे सांगितले. सोबतच बँकेच्या पासबुकमध्ये मात्र अशी वजा रक्कम नसून ५५७.९७ रुपये शिल्लक रक्कम असल्याचे आढळून आले. त्याबाबत विचारले असता पासबुकमध्ये तशी नोंद येत नाही मात्र एटीएम स्लीपवर वजा रक्कम दाखवित असल्याचे भंगाळे यांचे म्हणणे आहे. मात्र आॅगस्ट महिन्यात निवृत्ती वेतन या खात्यात जमा होऊन ते काढण्यातही आले आहे.पुराव्याचे कागदपत्रे नाही, पासबुकमध्ये नोंद नाही यामुळे विश्वास ठेवणे शक्य नसल्याने पत्रकारांनी विविध शंका उपस्थित केल्या. त्यावेळी उद्या १ सप्टेंबर रोजी निवृत्तीवेतन जमा होत ेकी नाही, हे पाहून पुन्हा पत्रकार परिषदेत माहिती देण्याचे भंगाळे यांनी जाहीर केले. त्यामुळे पुन्हा एकदा जळगावात भंगाळेचा ‘ड्रामा’ दिसून आल्याची चर्चा होती.
कथीत हॅकर मनीष भंगाळेचा पुन्हा ‘ड्रामा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:32 PM
बँक खाते सुरक्षित नसल्याचा दावा
ठळक मुद्देपुरावे नसल्याने पुन्बा पत्रकार परिषद घेण्याची घोषणापुन्हा एकदा जळगावात भंगाळेचा ‘ड्रामा’ दिसून आल्याची चर्चा