मुक्ताईनगर : येथे उपनगराध्यक्षपदी मनिषा प्रवीण पाटील यांची शनिवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान, निवडणुकीच्या एक महिन्यानंतर नगराध्यक्षाचा पदभार आज नजमा तडवी यांनी स्विकारला.स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये १७ पैकी १३ जागांवर भाजपाने विजय मिळवला. तसेच एक अपक्षही त्यांच्याकडे गेल्याने एकूण १४ जागा जिंकत तसेच नगराध्यक्ष पदावर देखील उमेदवार निवडून आणत भारतीय जनता पक्षाने आपला वरचष्मा कायम ठेवला होता.दरम्यान, तब्बल महिनाभरानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत उपनगराध्यक्षाची निवड करण्यात आली. या पदासाठी नगरसेवक निलेश शिरसाठ यांनी नगरसेविका मनिषा प्रविण पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला व त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून माजी सरपंच ललीत शांताराम महाजन व डॉ. प्रदीप पाटील यांच्या नावाची शिफारस नगरसेवकांमधून करण्यात आली व त्यास देखील सर्वच नगरसेवकांनी अनुमोदन देऊन दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले . नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या निधनामुळे सात दिवसांचा दुखवटा संपूर्ण भारतभर असल्याने कोणत्याही प्रकारचे स्वागत समारंभ यास फाटा देत नगराध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला. तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांच्या निवडीची घोषणा नगराध्यक्षांनी बैठकीत केली . यावेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा तडवी यांनी प्रथमच कामकाज सांभाळले . याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले यांनी काम पाहिले.आठ महिन्यानंतर मुक्ताईनगर नगरपंचायतचा कार्यभार हा सुरळीत सुरू झाल्याने शहरातील विविध रखडलेली विकासकामे, स्वच्छता , आरोग्य, गटारी, पाणी यासारख्या समस्यांवर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा नागरिकांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:36 AM
मुक्ताईनगर जि. जळगाव येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा प्रविण पाटील यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली तर माजी सरंपच ललीत महाजन आणि डॉ. प्रदीप पाटील यांंची स्विकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या नजमा तडवी यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार आज स्विकारला.
ठळक मुद्देनिवडणुकीनंतर तब्बल महिन्याभराने नगराध्यक्षांनी सांभाळला पदभारदोन जणांची स्विकृत सदस्यपदी निवड